`उत्तर काय आणि दक्षिण काय...,` Kalki 2898 AD चित्रपट पाहिल्यावर श्रद्धा कपूरची कमेंट; पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत अशा शब्दांत अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) त्यांचं कौतुक केलं आहे.
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या Kalki 2898 AD चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडून कौतुक होत आहे. यादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाऱ्या श्रद्धा कपूरने अमिताभ बच्चन यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. Kalki 2898 AD चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा अभिनय पाहून श्रद्धा कपूर प्रभावित झाली आहे. तिने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामला दोन स्लाईड्स शेअर केल्या आहेत. यावेळी तिने लिहिलं आहे की, "काय उत्तर, काय दक्षिण, काय पूर्व आणि काय पश्चिम; सगळा सिनेमा एका बाजूला आणि अमिताभ बच्चन दुसऱ्या बाजूला". श्रद्धा कपूरने यावेळी अमिताभ बच्चन यांचा Kalki 2898 AD चित्रपटातील फोटो शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका निभावली आहे.
हा पोस्ट शेअर करताना श्रद्धा कपूरने 'अमिताभ बच्चन स्वत:च एक सिनेमॅटिक युनिव्हर्स आहेत,' अशा शब्दांत कौतुक केलं आहे. श्रद्धाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. श्रद्धाचा स्त्री चित्रपटातील सह-कलाकार अभिषेक बॅनर्जीने यावर कमेंट करत 'सर्व बापांचा बाप' असल्याचं लिहिलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं गेल्यास Kalki 2898 AD नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याआधी त्यांनी टायगर श्रॉफ आणि क्रितीसोबत 'गणपत'मध्ये काम केलं होतं. याशिवाय 'द इंटर्न' या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ते काम करणार आहे. यामध्ये त्यांच्यासह दीपिका असणार आहे. या दोघांनी यापूर्वी 2015 मध्ये आलेल्या 'पिकू' चित्रपटात एकत्र काम केले आहे. अमिताभ बच्चन रजनीकांत यांच्यासोबतही एका चित्रपटात झळकणार आहेत. 'हम'मध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम केले होते.
तसंच श्रद्धा कपूर शेवटची रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार'मध्ये दिसली होती. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या 'भेडिया' चित्रपटातील ठुमकेश्वरी गाण्यातही ती दिसली होती.