मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात रोज नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सुशांत सिह राजपूतच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी आता बिहार पोलीस देखील मुंबईत दाखल झाली आहे. बिहार पोलीस प्रत्येक अँगलने प्रकरणाचा तपास करत आहेत. बिहार पोलीस सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीची देखील चौकशी करणार आहेत. सिद्धार्थ पिठानी यानेच सर्वात आधी सुशांतचा मृतदेह पाहिला होता. पिठानी हा सुशांत सोबतच राहत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थची चौकशी करण्यासाठी बिहार पोलीस प्रयत्न करत आहे. पण त्याचा फोन बंद आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीत सिद्धार्थ पीठानीचा जबाब प्रत्येक वेळी बदलेला दिसत आहे. त्यामुळे आता बिहार पोलिसांसाठी त्याची चौकशी करणं महत्त्वाचं झालं आहे.


मागील काही दिवसांपासून वांद्र्यात असलेले बिहार पोलीस सुशांतच्या आत्महत्येचं कारण शोधत आहेत. बिहार पोलीस मुंबई पोलिसांची मदत मागत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि या प्रकरणाशी संबंधिक लोकांचा जबाब काय होता याची माहिती बिहार पोलीस मुंबई पोलिसांकडे मागत आहे. पण मुंबई पोलीस कायदेशीर सल्ल्यानंतर याबाबत निर्णय घेणार आहे. बिहार पोलिसांना सुशांतची सेक्रेटरी दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला आहे. आता बिहार पोलीस दिशा आणि सुशांतमधील कनेक्शन तपासत आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला आहे. एकमेकांवर आरोप होत आहे. त्यामुळे सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. दुसरीकडे सीबीआय चौकशीची मागणी होत आहे. पण राज्य सरकार मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे हा तपास देण्यास सध्या तरी तयार दिसत नाहीये. त्यातच सुशांतच्या वडिलांनी रियावर केलेल्या आरोपानंतर बिहार पोलीस मुंबईत दाखल झाली असून प्रकरणाचा तपास करत आहेत.