आशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...
मुंबईत ५ व्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
नवी दिल्ली : मुंबईत ५ व्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या दिग्गज गायिका आशा भोसले. ८४ वर्षीय आशा भोसलेंना बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आशा भोसले यांनी चित्रपटसृष्टीतील ६० दशकांच्या आठवणींनी उजाळा दिला. त्याचबरोबर यश चोपडा यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणीही जागवल्या.
एकूण १६ हजारांहुन अधिक गाणी गायली
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण १६ हजारांहुन अधिक गाणी गायली आहेत. फक्त हिंदीच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमिल, मल्यालम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही त्यांनी गाणी गायली आहेत.
कलाकारांची मांदियाळी
आशा भोसलेंना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याप्रसंगी अभिनेता प्रेम चोपडा, अल्का याग्निक, परिणीती चोपडा, जॅकी श्रॉफ आणि पूनम ढिल्लो हे कलाकार उपस्थित होते. यापूर्वी हा पुरस्कार लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि शाहरुख खान यांना देण्यात आला आहे.