मुंबई : सेलिब्रिटींच्या नात्याविषयी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. अशाच वातावरणात आता आणखी एका सेलिब्रिटी जोडीच्या नात्याची माहिती समोर आली आहे. एका रिअॅलिटी शोच्या व्यासपीठावर या सेलिब्रिची जोडीने त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. ती जोडी म्हणजे गायिका नेहा कक्कड आणि तिचा प्रियकर, अभिनेता, गायक हिमांश कोहली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याच दिवसांपासून नेहा आणि हिमांशच्या नात्याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता खुद्द हिमांशनेच नेहा परीक्षक म्हणून असणाऱ्या 'इंडियन आयडॉल' या कार्यक्रमाच्या व्यापीठावर येत तिला आश्चर्याचा धक्का दिला. 


रिअॅलिटी शोच्या 'शादी स्पेशल' या भागात हिमांशला अचानक समोर पाहून नेहाला फारच आनंद झाला. यावेळी काही नाती ही मैत्रीपलीकडे असतात, असं सांगत हिमांशने नेहा आणि आपलं नातं हे मैत्रीच्या पलीकडे गेल्याचं स्पष्ट केलं.  



सोशल मीडियावरही या दोघांनी कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो पोस्ट करत एक प्रकारे त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. येत्या काळात आता त्यांच्या नात्यात आणखी कोणतं वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


'यारिया' या चित्रपटातील 'आज ब्लू है पानी पानी...' या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी हिमांश आणि नेहा पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. तेव्हापासून सुरु झालेलं त्यांचं नातं हे आज अतिशय सुरेख अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे.