ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा; `अगंबाई अरेच्चा`मधील चिमुकली आठवतेय? आता ती अशी दिसते
Marathi Movie : ही चिमुकली म्हणजे एका प्रतिभावान कलाकाराची लेक. आता इतकी मोठी झालीये की अतिशय लक्षवेधी भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. तिचे वडिलच साकारतायत एक अलौकिक कथा...
Marathi Movie : काही चित्रपट इतकी लोकप्रियता मिळवतात की, ते प्रदर्शित झाल्यानंतरही बरीच वर्षे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात. अशाच चित्रपटांच्या यादीतील एक नाव म्हणजे (Aga Bai Arrecha) 'अगंबाई अरेच्चा!'. (Kedar Shinde) केदार शिंदेच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटामध्ये संजय नार्वेकरची मध्यवर्ती भूमिका होती. दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, रसिका जोशी, सुहास जोशी, शुभांगी गोखले आणि सहकलाकारांच्या उत्तम अभिनयामुळं या चित्रपटानं कमाल लोकप्रियता मिळवली.
2004 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील लहानातली लहान भूमिका साकारणारे चेहरेही सर्वांच्याच लक्षात राहिले. मग ते 'रंगा'चे मित्र असो किंवा त्याच्या ऑफिसमध्ये चहा घेऊन येणारी रमा/ रामू असो. अगदी शिवाजी पार्कमध्ये बसलेल्या त्या चाफा विकणाऱ्या महिलेचा चेहराही अनेकांच्या लक्षात आहे. अशा या मनं जिंकणाऱ्या चित्रपटात एक चिमुकलीसुद्धा झळकली होती. अवघ्या काही क्षणांसाठी ती चित्रपटात दिसली, पण तिचं निरागस रुप सर्वांच्याच मनात घर करुन गेलं.
हेसुद्धा वाचा : बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा...
'ओ काकाsss मीच म्हणाले तुम्हाला वेडा.... पण, मनातल्या मनात. तुम्हाला कसं कळलं?'; असं म्हटलं की तिचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर येईल. आठवलं? हीच चिमुकली आता इतकी मोठी झालीये की ती आगामी बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातून अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
सोशल मीडियावर तिचा व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी खुद्द दिग्दर्शक केदार शिंदे यांनीच 'अगंबाई अरेच्चा!' चित्रपटातील या चिमणीचा एक व्हिडीओ शेअर केला. इथं त्यांनी तिच्या आगामी चित्रपटाविषयीही माहिती दिली. ही चिमुकली दुसरीतिसरी कुणी नसून, खुद्द केदार शिंदे यांचीच लेक आहे. सना शिंदे (sana shinde) असं तिचं नाव.
केदारच्या आगामी (Maharashtra shahir) 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटातून ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटातून अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. तर, केदारची लेक यामध्ये शाहिरांची पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. केदारनं तिच्या भूमिकेची एक झलकही चाहत्यांच्या भेटीला आणली. इथं जितकी उत्सुकता तिच्या या भूमिकेबद्दल पाहायला मिळाली तितकीच उत्सुकता चाहत्यांनी तिनं इतक्या वर्षांपूर्वी साकारलेल्या बालकलाकाराच्या भूमिकेबद्दलही दाखवल्याचं पाहायला मिळालं.