JNU प्रकरणी स्मृती इराणींचा दीपिकावर निशाणा
स्मृती इराणी यांनी दीपिकावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) 'छपाक' १० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दीपिकाने जेएनयूत जात सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. दीपिकाने जेएनयूमध्ये कोणतंही वक्तव्य केलं नाही. पण तिच्या जेएनयूतील एन्ट्रीनंतर सर्वत्र संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दीपिकावर निशाणा साधला आहे.
स्मृती इराणी यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितलं की, ज्यांनी ही बातमी वाचली त्यांना हे जाणून घ्यायचे असेल की, दीपिका आंदोलनकर्त्यांमध्ये का गेली? ती अशा लोकांसोबत उभी राहिली, ज्यांना भारताचे तुकडे करायचे आहेत. ती अशा लोकांसोबत उभी राहिली, ज्यांनी महिलांच्या विचारसरणीशी असहमत होण्याने, महिलांच्या खासगी भागांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली आहे.
भाजप नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी स्मृती इराणी यांच्या टिपणीचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. स्मृती इराणी यांनी बोलताना सांगितलं की, २०११ मध्ये दीपिकाने कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शविला होता. आणि पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना समर्थन देत, दीपिकाने तेव्हाच तिचं राजकीय मत स्पष्ट केलं होतं.
मंगळवारी सायंकाळी दीपिका जेएनयूमध्ये दाखल झाली. तिने JNUची अध्यक्ष आइशी घोषशी भेटही घेतली. १० मिनिटांपर्यंत दीपिका आंदोलनकर्त्यांसोबत होती. पण तिने कोणतंही विधान केलं नाही. पण जेएनयूत जाण्याच्या निर्णयानंतर काहींनी दीपिकाला शूर, तर काहींनी तिचं जेएनयूत जाणं एक पब्लिसिटी स्टंट किंवा प्रमोशनल फंडा असल्याचं म्हटलं होतं. दीपिकाच्या जेएनयू भेटीनंतर सोशल मीडियावर #boycottchhapaak आणि #BlockDeepika हे हॅशटॅग ट्रेन्ड होण्यास सुरुवात झाली.