मुंबई : संपूर्ण जगभरात सोशल मीडियाच्या वाढत्या वापरावर बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सोशल मीडिया नव्या पिढीसाठी अॅटम बॉम्ब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या माध्यमातून यूजर्स आपले विचार मांडू शकतात. सोशल मीडियावर राजकीय किंवा इतर कोणत्याही विषयावर आपला दृष्टिकोण मांडण्याची क्षमता असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाबाबत त्यांचे विचार बिग बींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहेत. अमिताभ बच्चन यांना सोशल मीडिया ट्विटरवर ३.६९ कोटी लोक फॉलो करतात. इंन्स्टाग्रामवर त्यांचे १.२६ कोटी फॉलोवर्स आहेत तर त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटला ३ कोटीहून अधिक लाइक्स आहेत. 



'सोशल मीडिया आधुनिक पीढीसाठी एक अॅटम बॉम्ब आहे. या सोशल मीडियाकडे शत्रूप्रती शांत प्रतिक्रिया जाहीर करण्याची ताकद आहे आणि त्यांना गुढघे टेकून माफी मागण्यासाठीही आणू शकत असल्याची ताकद असल्याचं' अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.


'जगात ७ अब्ज करोडहू अधिक लोक आहेत. प्रत्येकजण राजकारण किंवा इतर कोणत्याही विषयावर, मुद्द्यावर आपलं मत मांडू शकतो आणि महाद्वीपा पार त्याला पसरवूही शकतो. हे अतिशय विलक्षण, भीतीदायक आणि आव्हान देणारं' असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे. 



अमिताभ बच्च्न सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. ते सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या विषयावर ब्लॉगद्वारेही आपलं मत जाहीर करत असतात. अशाचप्रकारे त्यांनी सध्याच्या स्थितीतील सोशल मीडिया आणि ते काय काम करतंय याबाबत मत जाहीर केलं आहे. येत्या काही महिन्यांत अमिताभ बच्चन अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ब्रम्हास्त्र'मधून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे कपलही स्क्रिन शेअर करणार आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.