मुंबई : ‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं ! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’ ! या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. याच सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. याआधी ‘हंपी’, या नवीन कलाकृतीचं 'ग्लॅमरस' आणि 'फ्रेश-लूक' असलेलं पोस्टर आणि टिझर आत्तापर्यंत सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहे. वैभव जोशी आणि ओंकार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गीतांना, नरेंद्र भिडे आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत साज चढविला आहे .  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात निराशाग्रस्त ईशा (सोनाली कुलकर्णी) ट्रिप म्हणून हंपीला येते आणि तिचं आयुष्यच आमूलाग्र बदलते. मुळात ती हंपीला का जाते, तिथे ती काय करते, तिला तिथे कोण आणि कसे लोक  भेटतात याची उत्तरं अर्थातच यथावकाश १७ नोव्हेंबरला प्रेक्षकांना मिळतील.

हंपी ही प्रेमकथा आहे की इतरांपेक्षा स्वतःलाच स्वतःच्या प्रेमात पाडणारी कलाकृती आहे, की या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे हे अदिती मोघे यांच्या सुंदर कथा-पटकथा-संवाद आणि प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनातून उलगडत जाईल.  प्रकाश कुंटेच्या आधीच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी मनापासून पसंती दिली होती आणि आता प्रेक्षक त्याच्या नव्या कलाकृतीची वाट पाहत आहेत.   
 


‘स्वरूप समर्थ एंटरटेनमेंट’ निर्मित आणि अमोल जोशी प्रॉडक्शन, ‘स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडीया प्रा. लि.’, आकाश पेंढारकर, सायली जोशी, सचिन नारकर, विकास पवार प्रस्तुत,हंपी या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, छाया कदम अशी तगडी आणि ग्लॅमरस स्टारकास्ट आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांनी दिलेआहे, अमलेंदू चौधरी यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारे छायांकन केले आहे. संकलन प्राची रोहिदास, तर कला-दिग्दर्शन पूर्वा पंडित यांचे आहे. ध्वनी आरेखन, कार्तिक कुलकर्णी आणि आदित्य यादव यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, वेशभूषा सायली सोमण आणि रंगभूषा विनोद सरोदे यांची आहे. लाईन प्रोड्युसर म्हणून सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी जबाबदारी सांभाळली आहे. येत्या १७ नोव्हेंबरला हंपी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि प्रेक्षकांना पाहता पाहता हंपीला घेऊन जाईल.