माझ्या पहिल्या सीन आधीच डायरेक्टरने...` सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी सिनेमातील `धक्कातंत्र`चा अनुभव
Sonalee Kulkarni: राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित `मलाइकोट्टाई वालिबान` या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकत आहे.
Sonalee Kulkarni: मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनय आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने करिअरमधील पहिला मल्याळी सिनेमा केला आहे. हा अनुभव खूपच थरारक होता असे ती सांगते. अगदी सिनेमाच्या पहिल्या सीनपासूनच तिला याची प्रचिती येऊ लागली होती. पहिल्या सीनमध्ये असं अचानक काय झाल? काय म्हणाली सोनाली? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 'मलाइकोट्टाई वालिबान' (Malaikottai Vaaliban) सिनेमातील तिचा लूक चाहत्यांना चांगलाच आवडला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकत आहे. यात सोनाली सुपरस्टार दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. तिने मोहनलाल यांच्यासोबतचा अनुभव शेअर केलाय.
माझा आगामी सिनेमा 'मुघल मर्दानी छत्रपती ताराराणी' चे शूटींग करत असताना मला कॉल आला. मल्याळम सिनेमातील सुपरस्टार मोहनलाल सर आणि लिजो जोस यांनी मला कास्ट केलंय हे ऐकूनच मला आनंद झाला. अनेक कॉल्सनंतर हे खरे असल्याची पडताळणी मी केली. यासाठी मी मराठीतील अभिनेता आणि माझा मित्र सिद्धार्थ मेननशी बोलल्याचे ती सांगते.
सिनेमाचे ब्रीफ आणि निर्मात्यांसोबत मिटींग झाल्यानंतर मला कामाचा अंदाज आला. मल्याळम सिनेमातील मोठे नाव आणि दिग्दर्शकांसोबत काम करणे हा मोठा प्रोजेक्ट असल्याचे ती म्हणाली.
मल्याळमही चायनीज नंतरची शिकण्यासाठीची सर्वात कठीण भाषा आहे. त्यामुळे ती आत्मसात करण्याचा दबाव होताच. डिसेंबरमध्ये कोची येथे झालेल्या वर्कशॉपदरम्यान मी डायलॉग, स्क्रिप्टवर लक्ष्य केंद्रीत केले होते. अमल्याळी अभिनेत्री असल्याने मी माझे उच्चार, टायमिंग आणि एक्स्प्रेशन या साऱ्याकडेच लक्ष देत होते. भाषा हे कलाकारासाठी महत्वाची भूमिका निभावते. तुमच्या अभिनयाचा हा पाया असतो. 15 वर्षांपुर्वी मराठी सिनेमात पदार्पण करण्यापुर्वी माझी जी स्थिती होती, ती मला आठवली. मी स्क्रिप्ट लक्षात ठेवून भाषेवर आणि अभिनयावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवल्याचे तिने सांगितले. यानंतर तिने पहिल्याच सीनला आलेला अनुभव सांगितला.
मी प्रत्यक्षात शूटींगच्या वेळी माझ्या पहिला डायलॉगची तयारी केली. मोहनलाल सरांसोबतचा तो कठीण सीन शूट होणार होता. पण त्याच्या अवघ्या काही तास आधीच लिजो यांनी सीन पुन्हा लिहायचे ठरवले. हे माझ्यासाठी धक्कादायक होते. अचानक स्क्रिप्टमध्ये बदल झाला आणि नवीन सीन आला. तेही शूटींगच्या काही तास आधीच. याने मला पॅनिक व्हायला झालं. पण तो सिंगल टेकमध्ये सुंदर सीन झाला. सिनेमातील माझ्या आठवणींमध्ये हा जोडला गेल्याचे ती सांगते.
या घटनेतून लिजो जोस यांचे अभिनेत्याला अचानक धक्का देण्याचे तंत्र माझ्या लक्षात आले. त्या श्रणापासून मी त्यांच्या वेगळ्या अॅडवेंचर, जादुई दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्याचेही ती सांगते.
'मलाइकोट्टाई वालिबान' हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होत असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव असून प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री तिने व्यक्त केली आहे.