कॅन्सरशी लढताना सोनालीचा मुलासाठी हृदयस्पर्शी संदेश
सोनालीनं आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर केलाय
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या आपल्या आयुष्यातील अत्यंत कठिण आणि खडतर अशा अनुभवातून जात आहे. सोनाली कॅन्सरवर उपचार घेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सोनालीनं आपला नवीन लूक शेअर केला होता. आता सोनालीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखीन एक पोस्ट शेअर केलीय. सोनाली आपल्या चाहत्यांना आपल्या तब्येतीविषयी वेळोवेळी अपडेट देत असते. यावेळी सोनालीनं आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर केलाय. या पोस्टमध्ये सोनालीनं आपल्या मुलासाठी एक हृदयस्पर्शी आणि स्पेशल संदेश दिलाय.
फोटोत आपल्या मुलाच्या मागे उभी असलेली सोनालीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतंय. 'तो क्षण जेव्हा याने जन्म घेतला... १२ वर्ष ११ महिने आणि ८ दिवस... माझा लाडका रॉक बहल... माझ्या हृद्याचा राजा... आम्ही नेहमी त्याच्यासमोर सत्य मांडलंय. ही गोष्ट जेव्हा त्याच्यासमोर आली तोदेखील मोठ्या परिपक्वतेनं या गोष्टीला सामोरा गेला. ही माझ्यासाठी सकारात्मक गोष्ट आहे. काही वेळा तर तो माझ्याहून मोठा आणि मला सांभाळणार बनतो. मला काय करायचंय, याचेही धडे तो मला अधून-मधून देत असतो. मला वाटतं की मुलांनाही अशा परिस्थितीत सहभागी करून घ्यायला हवं... आपण त्यांना जितकं क्रेडिट देतो, त्यापेक्षा जास्त त्यांना मिळायला हवं. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे' असं सोनालीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
रॉकच्या शाळेला सध्या सुट्ट्या सुरू आहेत... त्यामुळे मी आणि रॉक एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत आहोत, त्याचा मस्तीखोर स्वभाव मला उपयोगी पडतोय, असंही सोनालीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.