मुंबई : कंगना रानौतचा 'मणिकर्णिका' या सिनेमा भोवतालची साडेसाती संपण्याचं नाव घेत नाहीय. आधी दिग्दर्शक क्रिशनं हा सिनेमा सोडला. त्यानंतर सोनू सूदनंही सिनेमातून काढता पाय घेतला. या सगळ्याला कंगनाची वर्तणूक जबाबदार असल्याचा आरोप दोघांनी केलाय. कंगनाने सुरुवातीला पटकथालेखन आणि त्यानंतर दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याने क्रिश यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. कंगना दिग्दर्शन करणार असल्याचं ऐकल्याने सोनू सूदनेही काम करण्यास नकार दिला... तर पुरुषी अहंकारामुळे त्याने हा चित्रपट सोडल्याची जळजळीत टीका कंगनानं केलीय. यानंतर, सोनूनंही कंगनाला प्रत्यूत्तर दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिग्दर्शक स्त्री आहे की पुरुष हे पाहून सिनेमा सोडलेला नाही. कंगना माझी चांगली मैत्रिण आहे आणि राहीलही... परंतु, हा सगळ्या गोष्टीला 'पुरुषी अहंकार' बनवणं मूर्खपणाचं लक्षण आहे... नेहमी पीडित कार्ड आणि महिला कार्ड खेळणं गरजेचं नाही... दिग्दर्शक स्त्री आहे की पुरुष हे महत्त्वाचं नाही तर त्यांच्या क्षमता महत्त्वाच्या आहेत. मी फराह खानसोबत काम केलंय... तीही एक महिला आहे आणि आमच्यात चांगलं व्यावसायिक नातं आहे... आणि आम्ही चांगले मित्रही आहोत' असं सोनू सूद यानं म्हटलंय.


अभिनेत्री कंगना रानौतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सातत्यानं अडथळे येत आहेत. आधी चित्रपटाच्या कथानकाला विरोध झाला, त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट सोडला आणि जेव्हा कंगनाने दिग्दर्शनाची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली, तेव्हा अभिनेता सोनू सूदने चित्रपटातून काढता पाय घेतला, अशा अनेक अडचणी या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान येत आहेत.


दिग्दर्शक क्रिश यांनी त्यांच्या इतर चित्रपटांच्या कामामुळे मध्येच ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट सोडल्याचं म्हटलं जात होतं. पण दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनाशी असलेल्या काही वादामुळे काढता पाय घेतल्याची चर्चा आता रंगतेय.


याआधीही 'सिमरन' चित्रपटाच्या वेळी कंगनाने अशाच प्रकारे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात ढवळाढवळ केल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या. जर या सगळ्या चर्चा खऱ्या असतील तर कंगनानं वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण तिची हीच वृत्ती राहिली तर भविष्यात कदाचित तिच्या बरोबर कुठलाच दिग्दर्शख, अभिनेता काम करण्यात स्वारस्य दाखवणार नाही.