ईडीच्या करावाईनंतर सोनू सूदचा मोठा निर्णय; गुजराती व्यावसायिकांसोबत महत्त्वाची बैठक
सोनू आम आदमी पक्षाचा सदस्य होवू शकतो?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोनू सूद आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना लवकरच पूर्णविराम लागू शकतो. तो लवकरच पक्षात सामील होऊ शकतो असे सांगितले जात आहे. त्याने बुधवारी पक्षाच्या काही नेत्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे. ऑगस्टमध्ये दिल्लीतील सत्ताधारी आपने सूदला 'देश के मेंटर' उपक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सन्मानित केलं. दैनिक भास्करच्या माहितीनुसार सोनू आम आदमी पक्षाचा सदस्य होवू शकतो.
रिपोर्टनुसार, आपच्या पदाधिकाऱ्यांची दिल्लीतील कार्यालयात सोनूच्या सदस्यत्वाबाबत बैठक झाली. विशेष बाब म्हणजे या बैठकीत गुजरातचे प्रसिद्ध व्यावसायिकही सहभागी झाले होते. 2022 मध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता सोनूच्या प्रत्येक निर्णयाकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे.
काही दिवसांपूर्वी सोनूने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. तथापि, एका मुलाखतीदरम्यान सोनूने उघड केले की दोन राजकीय पक्षांनी राज्यसभेच्या जागा देण्याची ऑफर दिली पण त्याने संबंधित ऑफरला नकार दिला. त्यानंतर देखील सोनू चर्चेत आला. दरम्यान ईडीच्या कारवाईनंतर सोनूबद्दल राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगल्या.