प्रभासच्या विवाहाविषयी कुटुंबातील व्यक्तीकडून मोठा खुलासा
याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे.....
मुंबई : फक्त दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी कलाविश्वातही अभिनेत्यांना चांगलीच टक्कर देत अभिनेता Prabhas प्रभास याने 'बाहुबली'च्या यशानंतर पुन्हा त्याच्या आगामी चित्रपटांव भर दिला. जीवनातील जवळपास पाच वर्षे या चित्रपटाच्या दोन भागांसाठी दिल्यानंतर प्रभासने साहो या चित्रपटातून भेट घेतली. या साऱ्यामध्ये मोठ्या पडद्यावर त्याच्या भूमिकांची चर्चा रंगली तितकीच चर्चा त्याच्या खासगी आयुष्याविषयीही रंगली.
'बाहुबली' या चित्रपटात प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्यासोबत वारंवार त्याचं नाव जोडलं गेलं. पण, प्रभास म्हणा किंवा मग अनुष्का; या दोघांकडूनही त्याच्या या तथाकथित प्रेमप्रकरणाविषयी स्पष्ट नकार देण्यात आला. आता पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे खुद्द प्रभासच्याच कुटुंबातील एका व्यक्तीने केलेला खुलासा.
एका तेलुगू ऑनलाईन पोर्टलशी संवाद साधताना प्रभासच्या नातेवाईक, श्यामला देवी यांनी त्याच्या लग्नाविषयीच्या काही गोष्टी सर्वांसमोर आणल्या. २०२०मध्ये 'जान' हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो लग्नबंधनात अडकणार असल्याचं श्यामला देवी म्हणाल्या. बरं त्यांनी यावेळी या लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी कोण असेल हे मात्र सांगितलं नाही. त्यामुळे ही उत्सुकता मात्र कायम आहे. प्रभासच्या लग्नाविषयी आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीविषयी आम्ही अनेकदा हास्यविनोद करतो, असं त्या म्हणाल्या. आमचं कुटुंब हे अतिशय मोठं असून त्यामध्ये मिळून मिसळून राहणारीच एखाद्या योग्य वधूच्या प्रतिक्षेत सारं कुटुंब असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, 'साहो' या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान एकदा प्रभासला त्याच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला होता. पण, यावर त्याने ही अत्यंत खासगी बाब असल्याचं म्हणत याविषयी फार काही बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे किमान २०२० मध्येतरी प्रभास त्याच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.