मुंबई : दाक्षिणात्य सेलिब्रिटींच्या वाढत्या प्रसिद्धीमध्ये एक चेहरा असा आहे, जो फार आधीपासूनच प्रसिद्धीझोतात आहे. तो चेहरा म्हणजे अभिनेता प्रभास याचा. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या अभिनयाने आणि अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रभासविषयी नव्याने काही सांगण्याची गरज नाही. 'बाहुबली' या चित्रपटामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि काहीसा लाजऱ्या आणि शांत स्वभावाचा हा अभिनेता सर्वांना अधिकच हवाहवासा वाटू लागला. आपल्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी काही व्यक्तींपुरताच सीमीत ठेवणारा हा अभिनेता लवकरच चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला सुजित दिग्दर्शित 'साहो' या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रभास व्यग्र आहे. पण, चित्रपटाच्या या व्यग्र वेळापत्रकातही तो चाहत्यांपासून तसूभरही दुरावलेला नाही. किंबहुना चाहत्यांसोबतच्या नात्यात असणारी दरी कमी करण्यासाठी म्हणून त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो लवकरच इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईटवर पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता प्रभासच्या खासगी आयुष्याचेही काही पैलू पाहण्याची संधी मिळणार आहे. मुख्य म्हणजे आपल्यावर अमाप प्रेम करणाऱ्या या चाहत्यांच्या आग्रहाखातरच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट होत आहे. 


सोशल मीडिया प्रभाससाठी नवं नाही. तो फेसबुकच्या माध्यमातून अनेकदा सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं आहे. आगामी चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित काही घोषणा तो या माध्यामातून करतो. पण, आता सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या इन्स्टाग्रामवर प्रभासच्या पदार्पणामुळे तो चाहत्यांच्या आणखी एक पाऊल जवळ जाईल असं म्हणायला हरकत नाही. 


'बाहुबली' प्रभास इन्स्टाग्रामवर येणार म्हटल्यावर कलाविश्वासोबतच चाहत्यांच्या वर्तुळात प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रभास इन्स्टाग्रामवर पदार्पण केव्हा करणार आणि तो कितपत सक्रिय असणार हेच पाहणं आता महत्त्वाचं 
ठरणार आहे.