मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता निर्माते- दिग्दर्शकही प्रेक्षकांसाठी अशाच अफलातून चित्रपटांचा नजराणा सादर करत आहेत. एकिकडे दाक्षिणात्य चित्रपट म्हटलं की 'बाहुबली'चंच नाव अनेकांच्या लक्षात येत असताना आता या चित्रपटामागोमाग आणखी एक नाव पुढे येत आहे. ते नाव म्हणजे मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ल्यूसिफर' या चित्रपटाचं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारण आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांचा आलेख पहिल्याच दिवसापासून उंचावत आहे. आता तर सर्वाधिक वेगाने शंभर कोटींची कमाई करणारा 'ल्यूसिफर' हा पहिलाच मल्याळम चित्रपट ठरत आहे. अवघ्या आठ दिवसांमघ्ये चित्रपटाची ही विक्रमी कामगिरी पाहायला मिळाली आहे. खुद्द अभिनेता मोहनलाल यांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. 



'फक्त आठ दिवसांमध्ये ल्यूसिफरने १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. हे खरंच अद्वितीय आहे. तुमच्याच पाठिंब्यामुळे आज मल्याळम चित्रपटसृष्टी काही नवी क्षितीजं पादाक्रांत करत आहे', असं ट्विटमध्ये लिहित मोहनलाल यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं म्हणजेच अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. 



मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही कलाकार आणि त्यांचं काम हे साऱ्या विश्वात बरंच चर्चेत आहे. विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देत काही असामान्य कथानकं रुपेरी पडद्यावर उतरवणाऱ्या चित्रपटसृष्टींमध्ये मल्याळम कलाविश्वाचाही समावेश आहे. त्यातही मोहनलाल आणि इतरही कलाकार मंडळींचंही मोलाचं योगदान आहे.