थलैवासोबत रोमान्स करण्यासाठी `ही` अभिनेत्री सज्ज
विविध भूमिका साकारत चाहत्यांना थक्क करणारे सुपरस्टार रजनीकांत यांचं आणखी एक रुप सर्वांसमोर येणार आहे.
मुंबई : विविध भूमिका साकारत चाहत्यांना थक्क करणारे सुपरस्टार रजनीकांत यांचं आणखी एक रुप सर्वांसमोर येणार आहे. '२.०' या चित्रपटातील भूमिकेच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर सर्वांच्याच मनावर राज्य करणारे रजनीकांत येत्या काळात 'पेटा' या चित्रपटातून झळकणार आहेत.
'पेटा'च्या प्रसिद्धीला नुकतीच मोठ्या दणक्यात सुरुवात झाली असताना आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत याविषयीचीच चर्चा सुरु असताना चित्रपटकारांनी त्यातील पात्र झळकणाऱ्या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
'सन पिक्चर्स'च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत अभिनेत्री त्रिशा झळकत आहे. ती या चित्रपटात 'सारो' saro ही व्यक्तीरेखा साकारत असून, रजनीकांत यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री सर्वांचच लक्ष वेधत आहे.
पोस्टरमध्ये त्रिशा ही झोका घेत असताना दिसत असून, तिच्याकडे मोठ्या प्रेमाने पाहणाऱ्या रजनीकांत यांच्या लूकवरही सर्वांच्याच नजरा खिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि विजय सेतूपती यांच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता.
'पेटा' हा चित्रपट बऱ्याच कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातीलच एक कारण म्हणजे यात बऱ्याच गोष्टी या प्रथमच घडत आहेत. कार्तिक सुब्बराज पेटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रजनीकांत यांच्यासोबत काम करत आहे. तर सिमरन, त्रिशा आणि वियत सेतूपती हे कलाकारही पहिल्यांदाच थलैवासोबत स्क्रीन शेअर करत आहेत.