समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! `आम्ही शांत राहणार नाही`, म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?
South Industry Naga-Samantha Divorce Remark : समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर केलेल्या वक्तव्यावर दाक्षिणात्य चित्रपटांनी व्यक्त केला संताप...
South Industry Naga-Samantha Divorce Remark : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि समांथानं ऑक्टोबर 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोट घेतल्याचे सांगितले. दोघांनी चाहते आणि मीडियाशी त्यांच्या या काळात प्रायव्हसी आणि चाहत्यांच्या पाठिंबा द्यावी ही विनंती केली होती. काही दिवसांपूर्वी नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपलासोबत साखरपुडा केला. त्यानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य आणि समांथाचं लग्न चर्चेत आलं आहे. दाक्षिणात्य सेलिब्रिटी हे तेलंगानाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखाच्या विरोधात समोर आले आहेत. सुरेखा यांनी बुधवारी तेलगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर सगळीकडून संताप व्यक्त केला जातोय.
नक्की काय आहे वाद?
तेलंगनाच्या कॅबिनेट मंत्रई कोंडा सुरेखा यांनी बुधवारी त्यांचे राजकारणातील विरोधी, बीआरएसचे अध्यक्ष के टी रामा रावला घेऊन एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी KTR वर अनेक आरोप केले आणि त्यांच्या कॅरेक्टरवर देखील प्रश्न उपस्थित केले. याच विषयी बोलताना सुरेखा यांनी म्हटलं की के टी रामा राव यांच्यामुळे समांथा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला.
नागार्जुन यांचा संताप
सुरेखा यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विरोध व्यक्त केला आहे. नागा चैतन्यचे वडील आणि लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की राजकारणापासून दूर राहणाऱ्या कलाकारांच्या आयुष्याला आपल्या विरोधकांवर टीका करण्यासाठी वापरू नका. कृपया दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा. एका मोठ्या हुद्यावर बसलेल्या महिला म्हणून आमच्या कुटुंबावर तुमच्या कमेंट्स या पूर्णपणे अनावश्यक आणि चुकीच्या आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे विधान त्वरित मागे घ्या.
नागा चैतन्यची सावत्र आई अमलाची संतापजनक पोस्ट
नागार्जुनची पत्नी आणि नागा चैतन्यची सावत्र आई अमालानं देखील या वक्तव्यावर कमेंट केली आहे. त्यांनी कमेंट करत म्हटलं की ही लाजिरवाणी गोष्ट आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना टॅग करत अमलानं पोस्ट शेअर केली की, जर तुमचा माणसाच्या सभ्यतेवर विश्वास असेल तर कृपया तुमच्या नेत्यांवर लगाम घाला आणि माझ्या कुटुंबाची माफी मागून तुमच्या मंत्र्याला त्यांनी केलेले हे विधान मागे घेण्यास सांगा. या देशातील नागरिकांचे रक्षण करा.
ज्युनियर एनटीआरनं पोस्ट शेअर करत दिला समांथा आणि नागा चैतन्यला पाठिंबा
ज्युनियर एनटीआरनं देखील यावर रिअॅक्ट केलं आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की लोकांच्या खासगी आयुष्याला राजकारणात खेचणं हे एका नवीन स्तराला गेलं आहे. पब्लिक फिगर्स, त्यातही ते तुमच्यासारख्या पदांवर आहे. त्यांना मर्यादा आणि गोपनीयतेचा आदर करायलाच हवा. कुठेही काहीही निराधार विधाने करत राहणे फार चुकीचं आहे, विशेषत: चित्रपट उद्योगाबाबत. इतरांनी आमच्यावर निराधार आरोप करतील तर आम्ही शांत बसणार नाही. आपण या सगळ्यांगोष्टींमधून बाहेर पडायला हवं आणि एकमेकांचा सन्मान करायला हवा. लोकशाही आणि आपल्या समाजात होणाऱ्या या गोष्टींना नॉर्मलाइज करायचं नाही.
चिरंजीवी यांची दाखवला विरोध
चिरंजीवी यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'महिला मंत्रीकडून असं काही वक्तव्य येणं ही खूप त्रास दायक गोष्ट आहे. सेलिब्रिटी आणि त्यांचं कुटुंब हे सॉफ्ट टार्गेट असणं फार वाईट आहे कारण त्यांच्यावर काही बोलल्यानंतर ते सगळ्यांपर्यंत लवकर पोहोचतं. चित्रपटसृष्टीतील आम्ही सगळे याच्या विरोधात आहोत.'
अल्लु अर्जुननं महिलांच्या आदराविषयी व्यक्त केली चिंता
अल्लू अर्जुननं पोस्ट शेअर करत त्याचा संताप व्यक्त करत हॅशटॅग वापरलं आह की #FilmIndustryWillNotTolerate चित्रपटसृष्टीतील व्यक्तीविषयी किंवा त्यांच्या कुटुंबाविषयी बोलण्यात आलेल्या या वक्तव्याच्या मी विरोधात आहे. हे खूप चुकीचं असून तेलगू संस्कृतीच्या मुल्यांच्या विरोधात आहे. या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. मी सगळ्यांना विनंती करतो की कोणत्याही व्यक्तीच्या प्रायव्हसीचा आणि त्यातल्या त्यात महिलेच्या प्रायव्हसीचा खूप जास्त विचार करा.
नानीच्या पोस्ट करत दिला समांथा आणि नागा चैतन्यला पाठिंबा
नानीनं यावर पोस्ट शेअर करत म्हटलं की 'कोणत्याही प्रकारचा मूर्खपणा करून आपण त्यातून सुटू शकतो असा विचार करणारे राजकारणी पाहणे खरंच किळसवाणे आहे. तुमचं बोलणं इतकं बेजबाबदार असताना तुम्ही तुमच्या लोकांसाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी घ्याल अशी अपेक्षा करणे मूर्खपणा आहे. हे फक्त अभिनेते किंवा चित्रपटांविषयी नाही. मुळात हा कोणत्याही राजकीय पक्षाचा विषय नाही. एवढ्या आदरणीय पदावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं प्रसारमाध्यमांसमोर अशी निराधार विधानं करणे आणि हे दूर होईल असं वाटणं अजिबात योग्य नाही. आपल्या समाजात चुकीचा संदेश देणाऱ्या या प्रथेचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे.'
दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी सुरेखा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की 'हे राजकारण कसंलं निर्लज्जपणासारखं आहे... चित्रपटात काम करणारी स्त्री ही कोणापेक्षा छोटी असते का?'
अभिनेत्री मंचू लक्ष्मी प्रसन्नानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, 'हे खरंच निराशाजनक आहे. जेव्हा केव्हा कोणत्याही नेत्याला सगळ्यांचे लक्ष वेधायचे असते तेव्हा ते अभिनेत्रीच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात करतात. ही संतापजणक गोष्ट आहे!'