कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली.
मुंबई : लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली.
या जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात, ‘डार्लिंग डार्लिंग, ‘नाथ हा माझा’ या प्रसिद्ध नाटकांचे सादरीकरण झाले. हाऊसफुल्ल गर्दीत प्रेक्षकांनी कालेलकरांच्या कलाकृतींना आपली प्रेमळ पोचपावती दिली. या सोहळ्याच्या उद्घाटनाला ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते पद्मभूषण राजदत्त यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी कै. मधुसूदन कालेलकर यांच्या स्मृतींना उजाळा देताना, ''मला चांगलं काम करण्याची प्रेरणा देणारा तसेच माझ्या अभिनय कारकिर्दीला दिशा देण्याचे मोलाचे सहकार्य करणारा उत्तम माणूस'' अशा शब्दात श्री. राजदत्त यांनी मधुसूदन कालेलकर यांना मानवंदना दिली.
मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मदिनी म्हणजे २२ मार्च रोजी 'सूर तेचि छेडीता' या सांगीतिक कार्यक्रमाने या महोत्सवाचा समारोप झाला. एक काळ गाजवलेली आणि आजही प्रत्येक वयोगटातील कानसेन आणि गानसेनांना भावणारी गाणी प्रेक्षकांच्या देखील ओठी रुळली हे पाहताना मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे डोळे पाणावले. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी, ''अशा महोत्सवांमधून जुनं ते सोनं या उक्तीची अक्षरशः जाणीव होते शिवाय तो काळ... तेव्हाची गाणी, चित्रपट यांमुळे एक वेगळाच आनंद रसिकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो असं सांगत'', महोत्सवासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
''महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांच्या गुणगौरवासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग हा एक संधी पाहत असतो. हिंदी-मराठी-गुजराथी अशा अनेक भाषांमधील साहित्यांत नाटककार, पटकथाकार, गीतकार अशा विविध विभागांत मुशाफिरी करणारे मधुसूदन कालेकलर यांना दैवी देणगीच लाभलेली आहे असं मी म्हणेन. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्याची संधी निर्माण केल्याबाद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.'' अशा शब्दांत विकास खारगे यांनी मधुसूदन कालेलकर यांचा गौरव केला.