मुंबई : अंगभर साडी परिधान करुनही रसिकांना घायाळ करता येतं, हा ट्रेन्ड श्रीदेवीचा... मिस्टर इंडियातील 'काँटे नही कटते...' हे गाणं याचं जिवंत उदाहरण... बंदी घालण्याची मागणी व्हावी, एवढं हे गाणं हॉट आणि हिट ठरलं... त्यामुळेच, बॉलिवूडमध्ये श्रीदेवीप्रमाणेच हिट झाली शिफॉन साडी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाक्षिणात्य शरीरयष्टी असलेल्या श्रीदेवीचं सौंदर्य साडीमध्ये अत्यंत खुलायचं... ऑन स्क्रिन असो की ऑफ स्क्रिन श्रीदेवी साडीमध्ये अगदी सहजपणे वावरायची... पिवळ्या रंगाच्या शिफॉन साडीतील 'चांदनी'मधील श्रीदेवी म्हणूनच आजही रसिकांना भुरळ पाडते... 'जाँबाज' चित्रपटातील 'हर किसी को नही मिलता यहा प्यार जिंदगी में' हे गाणं अजरामर ठरलं ते श्रीदेवीमुळे... फिरोज खानला ती एका गाण्यापुरती का होईना चित्रपटात हवी होती... श्रीदेवीने तो विश्वास सार्थ ठरवला.


शिफॉन साडीतील मादक नायिका ते 'इंग्लिश विंग्लिश'मधील मराठमोळी गृहिणी... स्त्रीदेवीच्या अभिनयाइतक्यात तिच्या साड्यांमधून या व्यक्तीरेखा जिवंत झाल्या... इंग्लिश विंग्लिशमध्ये एकही मराठी संवाद न बोलता तिच्या देहबोलीतून आणि तिच्या साड्यांमधून तीनं मराठीपण दाखवलं... तिच्या साध्या साड्यांमुळे अनेक गृहिणींनी तिच्यात आपलं प्रतिबिंब पाहिलं. महाराष्ट्रीन पैठणी साडीविषयी तिला विशेष प्रेम होतं.


श्रीदेवी आणि तीचं साडी प्रेम

सब्यासाची आणि मनिष मल्होत्रा हे तिचे आवडते डिझायनर आणि मित्रही... खास श्रीदेवीसाठी साड्या डिझाईन व्हायच्या... कांजीवरम असो की डिझायनर साडी... श्रीदेवीमुळे त्या साडीला सौंदर्य लाभायचं... पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना श्रीदेवीने गुलाबी रंगाची भरजरी कांजीवरम साडी परिधान केली होती. लखनौमध्ये तर एका प्रदर्शनात श्रीदेवी साडीचाही ट्रेन्ड होता. 'चांदनी'मधील तिच्या बांगड्यांचा आणि साड्यांचा ट्रेन्ड मार्केटमध्ये पाहायला मिळाला.


पांढरा हा श्रीदेवीचा आवडता रंग... अनेकदा साडी नेसली की डोक्यात भरगच्च पांढऱ्या मोगरांचे गजरे आलेच... तीच्या इच्छेप्रमाणे याच पांढऱ्याशुभ्र मोगऱ्यांचा सुवास मागे सोडत तीनं आज चाहत्यांचा निरोप घेतलाय.