आज रात्री उशिरा श्रीदेवीचा मृतदेह भारतात आणण्याची शक्यता
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह आज रात्रीच भारतात आणला जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह आज रात्रीच भारतात आणला जाण्याची शक्यता आहे. दुबई पोलिसांनी ३ तास बोनी कपूर आणि त्यांची मुलगी खुशी यांची चौकशी केली. त्यानंतर श्रीदेवींच्या मृत्युबाबत कोणताही संशय नाही, असा निर्वाळाही दुबई पोलिसांनी दिलाय.
अभिनेत्री श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. श्रीदेवी यांचं मृत्यू प्रमाणपत्रही कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.
"श्रीदेवी यांच्या शरीरात दारुचे अंश आढळले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर बाथटबमध्ये बुडून झाला", असा दावा गल्फ न्यूजने केला आहे.
परवा (24 फेब्रुवारी) रात्री संयुक्त अरब अमिरातमधल्या अबुधाबीत प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं. अवघ्या 54 व्या वर्षी त्यांनी चाहत्यांना कायमचं पोरकं केलं. भाच्याच्या लग्नासाठी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत श्रीदेवी दुबईमध्ये होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवीचा मृतदेह रात्री उशिरा मुंबईत आणला जाऊ शकतो.
अशी माहिती आहे की, थोड्या वेळात श्रीदेवीचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला जाणार.
त्याआधी दुबई पोलिसांनी श्रीदेवीच्या मृत्यूमागे कोणतही षडयंत्र नसल्याचा निर्वाळा दिलाय.
श्रीदेवीच्या मृतदेहावर दुबईतील सोनापूरमध्ये रासायनिक प्रक्रिया केली जाईल.