दुबई : दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं.  भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. लग्न झाल्यानंतर श्रीदेवीचे नातेवाईक परत आले पण श्रीदेवींनी मात्र काही दिवस तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. दुबईमधल्या जुमैरा एमिराट्स टॉवर या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या. हॉटेल रुमच्या बाथरूममध्ये श्रीदेवी बेशुद्ध आढळून आल्या. यानंतर त्यांना दुबईच्या राशित रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी यांनी अखेरचा श्वास घेतला.


बाथटबमध्ये बुडून मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खलीज टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार श्रीदेवींचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यू बुडून झाल्याचा दावा खलीज टाईम्सनं केला आहे. श्रीदेवी यांच्या रक्तामध्ये दारूचा अंशही आढळून आला आहे. 


श्रीदेवींच्या मृत्यूचा फॉरेन्सिक रिपोर्ट (सौजन्य-खलीज टाईम्स)



म्हणून श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम


दुबई हे युएईमधलं प्रमुख शहर आहे. इथल्या कायद्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टम करून केलं जातं. पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होतं. त्यानंतर ही कागदपत्रं पोलिसांकडे दिली जातात आणि मग पोलीस मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब करतात. हा रिपोर्ट पोलीस मृत व्यक्ती ज्या देशाची आहे तिथल्या दुतावासाला देतात. यानंतर दूतावास मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करतं आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (एनओसी) देतं. यानंतर पार्थिव नातेवाईकांकडे सोपवलं जातं.