श्रीदेवींना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बोनी कपूर यांची प्रतिक्रिया
`मॉम` सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती...
मुंबई : नुकतीच 65 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीय. यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना त्यांच्या 'मॉम' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यानंतर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी आपला आनंद व्यक्त केला पण यावेळी ते अतिशय भावूक झाले. 'ती हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिवंत असती तर...' असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
श्रीदेवी यांचं निधन याच वर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईत झालं होतं. बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालातून समोर आलं. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी राजकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
'मॉम' सिनेमात श्रीदेवी यांनी एका कणखर आईची भूमिका निभावली होती. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीनं एका गुप्तहेराची भूमिका निभावली होती.
उल्लेखनीय म्हणजे, 'मॉम' हा श्रीदेवी यांचा 300 वा सिनेमा होता. सिनेमात त्या एका सावत्र आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या... या सिनेमाचं कथानक या आई आणि तिच्या मुलीभोवती गुंफलं गेलं होतं.
या सिनेमातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. सिनेपरिक्षकांनीही या सिनेमाला चांगले गुण दिले होते.
या सिनेमातून श्रीदेवी यांनी जवळपास पाच वर्षानंतर मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली होती. याआधी त्यांचा 'इंग्लिश विंग्लिश' हा सिनेमालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.