मी इतका नास्तिक आहे की, पत्नी रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर...; राजमौलींनी सांगितला `तो` प्रसंग
SS Rajamouli On Being Atheist: आपल्या चित्रपटांमधून धार्मिक संदर्भ देत जगभरात नाव कमवणाऱ्या कथा चित्रपटांमधून सांगणारा व्यक्ती एवढा नास्तिक असू शकतो यावर विश्वास बसणार नाही.
SS Rajamouli On Being Atheist: प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट निर्माते एस.एस. राजामौली हे धार्मिक गोष्टींचा संदर्भ देत कथा सांगण्यामध्ये निपुण आहेत. खरं तर त्यांच्या इतकं भन्नाट स्टोरी टेलिंग कोणीच करु शकत नाही असं अनेक चाहत्यांचं म्हणणं आहे. मात्र धार्मिक संदर्भ देत चित्रपटांमधून कथा सांगणारी व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात धार्मिक असेलच असं नाही. आरआरआर, बाहुबली यासारख्या चित्रपटांमुळे केवळ दक्षिणेत आणि भारतातच नाही तर जगभरामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या राजमौली यांनी आपण नास्तिक असल्याचं नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलं. विशेष म्हणजे आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगामध्येही आपण देवाचा धावा केला नाही, असं राजमौली म्हणाले.
देवावर विश्वास बसला असं कधी घडलं नाही
नेटफ्लिक्सवरील 'मॉडर्न मास्टर्स : एस.एस. राजामौली' या डॉक्युमेंट्रीमध्ये राजामौली यांचा आतापर्यंतचा प्रवास त्यांच्याच मुलाखतीच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. आपल्या खासगी आयुष्यातील काही कठीण प्रसंगांमध्येही आपला देवावर विश्वास आहे असं कधीच घडलं नसल्याचं राजामौली म्हणाले. असाच एक प्रसंग सांगताना राजमौली यांनी पत्नी रामा राजामौली यांच्या अपघाताबद्दलच्या आठवणीला उजाळा दिला. दुर्गम भागामध्ये प्रवास करताना झालेल्या अपघातामध्ये पत्नी रामा राजामौली गंभीर जखमी झाली होती. हा अपघात राजामौली राम चरणची प्रमुख भूमिका असलेल्या 'मगधिरा' चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या कालावधीत घडला होता.
मोठ्याने रडलो
पत्नीबरोबर जाताना मोठ्या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाल्यानंतर मी काही क्षण स्तब्ध झालो होतो. मी मोठमोठ्या रडू लागलो. मी त्यावेळी शक्य होईल त्या प्रत्येक डॉक्टरबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असं राजमौली म्हणाले. पत्नी रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर पडली होती. तिचा कंबरेखालील भाग पॅरलाइज झाला होता. मात्र त्यावेळीही मी कर्मावर विश्वास ठेवला, असं राजमौली म्हणाले.
पत्नी रक्तबंबाळ झालेली असताना मी...
आपण पत्नी मरणाच्या दारात असतानाही नास्तिकच होतो असं अधोरेखित करणारा एक प्रसंगही राजमौली यांनी या मुलाखतीत सांगितला. राजमौली आणि त्यांच्या पत्नीचा एका दुर्गम ठिकाणी अपघात झाल्यानंतरचा प्रसंग सांगताना त्यांनी, "अपघात झाला तिथून जवळचं रुग्णालय 60 किलोमीटरवर होतं. मी फार घाबरलो होतो. त्यावेळेस माझ्या मनात विचार सुरु होता की, मी आता देवाने मला मदत करावी म्हणून प्रार्थना करायला हवी का? असं स्वत:ला विचारत होतो. मात्र मी ते केलं नाही. मी मोठ्याने रडलो आणि त्यानंतर मी शक्य होईल तितक्या डॉक्टरांना फोन करत होतो आणि पत्नीला वाचवण्यासाठी जे काही ते सुचवत होते ते करत राहिलो. मला वाटतं एका ठराविक काळानंतर मी कर्मावरच विश्वास ठेवण्याची भूमिका स्वीकारत माझं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी माझं कामच माझा देव आहे. मला चित्रपटाबद्दल फार जास्त आदर आहे," असं म्हटलं.
वडिलांच्या मुलाखतीचाही समावेश
नेटफ्लिक्सच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये एस. एस. राजमौली यांचे वडील म्हणजेच लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांचीही मुलाखत आहे. यामध्ये त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या मुलाचा देवावर फार कमी विश्वास आहे हे सांगताना यामुळे त्यांचं कुटुंब कधीच देवभोळं झालं नाही असं सांगितलं.