विशाल निकम झळकणार डॅशिंग अंदाजात, आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा प्रोमो
यात अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.
Yed Lagla Premach New Serial : स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका प्रदर्शित होत आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' आणि 'साधी माणसं' या मालिकेनंतर स्टार प्रवाहवर 'येड लागलं प्रेमाचं' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.
प्रेम हे माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकतं. प्रेमात समोरच्याला बदलण्याचा अट्टहास नसतो, जे जसं आहे ते अगदी तसं त्याच्या पूर्ण गुण-दोषांसकट स्वीकारणं म्हणजे प्रेम. येड लागलं प्रेमाचं ही मालिकाही प्रेमातल्या वेडपणाची साक्ष देणारी असेल. महाराष्ट्राचं कुलदैवत अशी ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरपुर नगरीत या मालिकेची गोष्ट घडणार आहे. एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या राया आणि मंजिरीचा प्रेमात पडण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेत दाखवला जाणार आहे.
विशाल निकमसोबत पूजा बिरारी झळकणार नव्या मालिकेत
या मालिकेत अभिनेता विशाल निकम हा राया हे पात्र साकारत आहे. तर पूजा बिरारी ही या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशाल निकम आणि पूजा बिरारीसोबतच या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
विशाल निकम काय म्हणाला?
राया या पात्राविषयी सांगताना अभिनेता विशाल निकम म्हणाला, ‘स्टार प्रवाह माझं कुटुंब आहे. या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होतोय याचा खूप आनंद आहे. मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळं आणि हटके असं हे पात्र आहे. खऱ्या आयुष्यातही माझं आणि विठुरायाचं खास नातं आहे. माऊलींच्या आशीर्वादामुळेच इथवरचा प्रवास मी करु शकलो. माझ्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. या मालिकेची गोष्ट देखिल पंढरपुरात घडते. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. पूजा बिरारीसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे. पूजा खूप समजूतदार आहे. ती स्वत:पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते. माणूस म्हणून ही सर्वात मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पूजाच्या याच स्वभावामुळे आमचे सीन्स खूप छान होत आहेत, अशी भावना विशाल निकम याने व्यक्त केली.
पूजा बिरारीची प्रतिक्रिया
"एका छोट्या ब्रेकनंतर मी देखील मंजिरी हे पात्र साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे. मंजिरी या नावातच गोडवा आहे. हाच गोडवा या पात्रात देखिल आहे. विठुराया तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. ‘शुटिंगच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच पंढरपुरात गेले. पण पहिल्यांदा गेलेय असं जाणवलं नाही. पंढरपुराने मला आपलसं केलं आहे असं मला वाटत होतं. पंढरपुरातल्या प्रत्येक गोष्टीत विठुरायाचा वास आहे. शुटिंगच्या निमित्ताने ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. याआधीच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम यापुढेही मिळेल याची मला खात्री आहे" अशी भावना पूजा बिरारीने व्यक्त केली.