झी युवा सादर करतंय `स्पर्श वात्सल्याचा`
कसा असणार हा शो?
मुंबई : विविध विषय आणि सादरीकरणातील नावीन्याने अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी हिवाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.
पहिलं बाळ जन्माला आल्यावर आयुष्याच्या चित्रात नव्याने रंग भरले जातात. जीवनाच्या कॅनव्हासवर अनुभवांच्या रेषा रेखाटत आई बाबा आपल्या बाळाचं संगोपन करतात आणि ते संगोपन करताना आजी आजोबांची सोबतअसतेच. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात 'स्पर्शवात्सल्याचा' हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे. कुटुंबात जन्माला आलेल्या पहिल्या मुलाशी जोडल्या गेलेल्या भावना या कार्यक्रमातून प्रेक्षकांसाठी सादर केल्या जाणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदक मुंबईतील अनेकघरांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वयस्कर व्यक्तींशी, नातेवाईकांशी आणि प्रथमच नवीन पालक बनलेल्यांशी संवाद साधणार आहेत.
८ महिने ते दीड वर्षांची मुले असलेल्या पालकांची मुलांची काळजी घेण्याची संकल्पना सुधारण्याचेध्येय असलेल्या या कार्यक्रमामध्ये कुटुंबासोबत मजेदार गप्पांचासुध्दा समावेश आहे. त्यांच्या लहानग्यांची काळजी घेण्याविषयीचे गंमतीदार आणि भावनाशील अनुभव स्पर्श वात्सल्याचा मधून पालक सांगू शकणार आहेत. परस्परसंवाद साधत असतानाच, निवेदक पालक आणि आजीआजोबांना काही गंमतीदार खेळ खेळायला लावणार आहे आणि त्यातून कार्यक्रमाची रंजकता वाढणार आहे. तसेच या कार्यक्रमाचा मुख्य केंद्र असणार आहे बाळ आणि 'स्पर्शवात्सल्याचा' मध्ये त्या दिवसातील त्याचे गोंडस क्षण टिपणे हा. या लहानग्यांसोबत असलेल्या जिव्हाळ्याने आणि भावनेने परिपूर्ण असलेला हा कार्यक्रम ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वेगळ्या धाटणीचा स्पर्श वात्सल्याचा हा कार्यक्रम झी युवा ६ ऑगस्ट पासून संध्याकाळी ६.३०वाजता सादर करणार आहे.