बॉलिवूडमध्ये `स्त्री 2` चा गदर! जवान, पठाण चित्रपटांचे रेकॉर्ड अक्षरश: चिरडले; एकट्या श्रद्धा कपूरने अख्खं बॉलिवूड हलवलं
`स्त्री 2`ने (Stree 2) बॉलिवूडमध्ये अक्षरश: वादळ आणलं असून, कोणीही अपेक्षा केली नव्हती इतकी जबरदस्त कारवाई केली आहे. `स्त्री 2` ने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) जवान (Jawan) चित्रपटाने केलेल्या कमाईचा आकडा पार केला आहे.
Stree 2 Collection: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'स्त्री 2' चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या Maddock Films ने याला दुजोरा दिला आहे. एक्सवर चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. चित्रपटाने शाहरुख खानच्या जवान (फक्त हिंदी भाषेतील कमाई) चित्रपटाच्या संपूर्ण कमाईला मागे टाकलं आहे.
स्त्री 2 च्या टीमने नव्या रेकॉर्डला दिला दुजोरा
पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे की, 'भारताच्या बॉक्स ऑफिसवरील पहिल्या क्रमांकाचा हिंदी चित्रपट'. कॅप्शनमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, "ती स्त्री आहे आणि तिने करुन दाखवलं आहे. हिंदुस्तानातील सर्वोत्कृष्ट नंबर 1 हिंदी चित्रपट".
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "आमच्यासह हा इतिहास रचण्यासाठी सर्वाच चाहत्यांची खूप सारे आभार. स्त्री 2 अद्यापही चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे सुरु आहे. चित्रपटगृहांमध्ये या, आणखी काही रेकॉर्ड्स रचूयात".
पाचव्या आठवड्यात चित्रपटाने शुक्रवारी 3.60 कोटी, शनिवारी 5.55 कोटी, रविवारी 6.85 कोटी, सोमवारी 3.17 कोटी, मंगळवारी 2.65 कोटी कमावले आहेत.
जवानची कमाई किती?
Sacnilk.com नुसार, जवान चित्रपटाची सर्व भाषांमध्ये भारतातील कमाई (हिंदी, तमिळ आणि तेलगू) 640.25 कोटी आहे. हिंदीमध्ये भारतात चित्रपटाने 582.31 कोटी कमावले आहेत.
जवान (2023) हा ॲटलीने दिग्दर्शित केलेला ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान पिता आणि मुलगा अशा दुहेरी भूमिकेत आहे. नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.
स्त्री 2 बद्दल जाणून घ्या
अमर कौशिकने दिग्दर्शित केलेल्या 'स्त्री 2' मध्ये वरुण धवन आणि अक्षय कुमार यांचा कॅमिओ देखील आहे. स्त्री चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. यामुळे सिक्वेलकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. त्यानुसार 'स्त्री 2' ने देशभरातील चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या असून मनं जिंकली आहेत. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही भूमिका आहेत.