`तिला माझ्याकडून फक्त...`, सुकेश चंद्रशेखरने पत्र लिहीत जॅकलिनबद्दल केला मोठा खुलासा
सुकेशने तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिलं आहे
200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. सुकेशने आता तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये सुकेशने जॅकलिन फर्नांडिसबद्दल (Jacqueline Fernandez) मोठा खुलासा केला आहे. सुकेशने स्वत:वर आणि जॅकलिनवर होत असलेल्या आरोपांवर पत्रात भाष्य केले आहे.
सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) त्याच्या वकिलाला लिहिलेल्या पत्रात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 200 कोटींच्या घोटाळ्यात कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले आहे. त्याने पत्रात जॅकलिनला दिलेल्या महागड्या भेटवस्तू, दिलेली कार हे केवळ फक्त रिलेशनशिपमध्ये होतो म्हणून दिल्याचं सांगितलं आहे. रॅनबॅक्सीच्या माजी मालकाच्या सुटकेसाठी आपल्याला 200 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावाही सुकेशने केला आहे.
पीएमएलए प्रकरणात जॅकलीनला आरोपी बनवण्यात आले हे खूप दुर्दैवी आहे. मी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि याच रिलेशनशिप अंतर्गत मी जॅकलीन आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये त्यांचा काय दोष? असे सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे.
जॅकलीनने माझ्याकडून फक्त प्रेम आणि तिच्यासोबत उभे राहण्याशिवाय काहीही मागितले नाही. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबावर खर्च केलेला प्रत्येक पैसा कायदेशीररित्या कमावला होता आणि तो लवकरच ट्रायल कोर्टात सिद्ध होईल, असेही सुकेशनं म्हटलं आहे.
जॅकलिन आणि तिच्या कुटुंबाला मनी लाँड्रिंग प्रकरणात ओढण्याची गरज नव्हती. जॅकलीन आणि तिच्या कुटुंबियांना फसवणूक प्रकरणात बळजबरीने ओढण्यात आल्याचे येत्या काळात न्यायालयात सिद्ध होईल. यात त्यांचा दोष नाही, असे सुकेश चंद्रशेखरने म्हटलं आहे. सुकेशने असेही म्हटले आहे की तो एक दिवस जॅकलिनला गमावलेले सर्व काही परत करेल आणि तिला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करेल. सुकेशने आपल्यावरील फसवणुकीच्या प्रकरणाचे वर्णन राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, जॅकलिन फर्नांडिसला दिवाळीपर्यंत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनच्या अंतरिम जामीनाला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जॅकलिन फर्नांडिस 22 ऑक्टोबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयात हजर झाली होती. कोर्टाने जॅकलिनच्या जामिनात वाढ केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला सर्व पक्षकारांचे आरोपपत्र आणि खटल्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे देण्याचे आदेश दिले आहेत.
सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. आता खुद्द सुकेशनेही याबाबत कबुली दिली आहे.
त्याचवेळी जॅकलीन आणि सुकेश यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते. काही काळापूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे काही इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यानंतर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होते.