Rajinikanth News : रजनीकांत.... नाम ही काफी है. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अभिनयाच्या बळावर मोठ्या झालेल्या या कलाकाराला प्रेक्षकांनी कायमच अमाप प्रेम दिलं. याच प्रेमापोटी वयाचा आकडा वाढत असला तरीही रजनीकांत यांचा अभिनयाप्रती असणारा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. आपल्या अनोख्या स्टाईलनं सिनेरसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्यानं आतापर्यंत कायमच सर्वांचं मनोरंजन केलं. पण, आता मात्र हेच रजनीकांत अनेकांना थक्क करत आहेत. 


नक्कल करण्यापर्यंत ठीक, पण प्रकरण पुढे गेलंय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांची नक्कल तुम्हीआम्ही एकदातरी केलीच असेल. पण, गेल्या काही काळापासून बऱ्याच ब्रँड्सकडूनही जाहिरातींसाठी या सुपरस्टारची नक्कल केली गेली. यापुढे मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही. 


माध्यमांमध्ये चर्चेत असणाऱ्या वृत्तानुसार रजनीकांत यांच्या वकिलांकडून त्यांची स्वाक्षरी असणारं एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या परवानगीशिवाय कुणीही त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा वापर स्वत:च्या नफ्यासाठी केला तर ही मंडळी कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. कारण हे अभिनेत्याच्या Identity, Publicity and Celebrity हक्कांचं उल्लंघन असेल. ज्यामुळं असं करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. 


हेसुद्धा वाचा : 'आपल्याला उशिरा का होईना...' महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारची 'ती' पोस्ट चर्चेत


रजनीकांत यांच्याकडेच त्यांचं नाव, आवाज, फोटो आणि ओळख वापरण्याचा हक्क आहे. या गोष्टी सर्वस्वी त्यांच्याशीच जोडल्या गेल्या आहेत. नोटिसमध्ये फक्त रजनीकांतच नव्हे, तर इतर कोणत्याही कलाकारांचे फोटो वापरणाऱ्या किंवा तत्सम कृती करणाऱ्या व्यक्तीसुद्धा कारवाईस पात्र असतील असंही नमूद करण्यात आलं आहे. खड्या शब्दांत दिलेली ही ताकिद आता किती जणांकडून गांभीर्यानं विचारात घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


बिग बींच्याच पावलावर पाऊल ठेवत रजनीकांत यांनी घेतला निर्णय 


रजनीकांत यांच्याआधी अमिताभ बच्चन यांनीही असाच एक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन यांचा आवाज किंवा फोटो परवानगीशिवाय वापरल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल असे अंतरिम आदेश दिल्ली हायकोर्टानं दिले. विनापरवानगी फोटो आणि आवाज वापरून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रसारित होत असल्याचा आरोप करत बच्चन यांनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यावर हा निर्णय सुनावण्यात आला.