मुंबई :  रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी मागच्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. प्रतिकूल परिस्थितीही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला. विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. गोखलेंची अखेरची कलाकृती ठरलेल्या 'सूर लागू दे' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केलं आहे. आता 'सूर लागू दे' हा सिनेमा रसिकांच्या मनाचे सूर छेडण्यासाठी सज्ज झाला असून पिकल एंटरटेन्मेंट स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात येणार आहे. 


३० ऑक्टोबर रोजी अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस असतो. याच दिवसाचं औचित्य साधत बांद्रा येथील एमआयजी क्लबमध्ये विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली विक्रम गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते 'सूर लागू दे'च्या नवीन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला अनिल कालेलकर, मनोज पाखाडे, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकारांसह सिनेसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी विक्रम गोखलेंच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या अखेरच्या कामाची माहिती काहींनी दिली, तर त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढताना काहींचा कंठ दाटून आला. 


विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेली 'सूर लागू दे'सारखी दर्जेदार कलाकृती सर्वदूर पोहोचवण्याच्या हेतूने हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणण्यात येणार असल्याचे प्रस्तुतकर्ते रतिश तावडे यांनी सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आलेल्या सुहासिनी मुळ्ये आणि विक्रम गोखले या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज कलाकारांची जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल अशी आशा दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांनी व्यक्त केली. 'सूर लागू दे'च्या रूपात प्रेक्षकांना एक परिपूर्ण कलाकृती पाहायला मिळेल असेही ते म्हणाले. 


आयुष्याच्या संध्याकाळचे एक विलोभनीय चित्र या चित्रपटाच्या रूपात सादर करण्यात आलं आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीवेचं भान राखून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. विक्रम गोखले यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत 'सूर लागू दे'च्या रूपात त्यांचे अखेरचे सूर रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. विक्रम गोखलेंना समर्पित करण्यात आलेल्या या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.



मालिकांसोबत मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली रीना मधुकर आणि 'कलियों का चमन...' फेम मेघना नायडू या चित्रपटातील सरप्राईज पॅकेज आहेत. त्यांच्या जोडीला आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुक्के, नितीन जाधव, आशा न्याते, मेरू वेरणेकर, अनुराधा मोरे, शेखर शुक्ला, संदीप गायकवाड, हितेंद्र उपासनी, प्रदीप पटवर्धन, अस्लम वाडकर, सोमनाथ तळवलकर, सुनील जाधव, दीपिका गोलीपकर, अलका परब, अतुल गानोरकर, दिलीप कराडे, संदीप जयगडे, अमोघ चव्हाण, औदुंबर बाबर आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.