मुंबई : आपल्या अभिनयाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री भूमि पेडणेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी सिनेमात भूमि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं टायटल ‘सोन चिरैया’ असं आहे. त्यामुळे ‘टॉयलेट’नंतर आता ती काय कमाल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


भूमि पेडणेकर या सिनेमात लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत दिसणार आहे. दोघांनाही या सिनेमासाठी फायनल करण्यात आलंय. अभिषेकचा हा सिनेमा चंबलमधील डाकूंच्या जीवनावर आधारित आहे. आतापर्यंत बॉलिवूड सिनेमांमध्ये चंबलच्या डाकूंचं काळं विश्व समोर आणलं आहे. आता या सिनेमातून त्यांची दुसरी बाजू समोर येईल. 


या सिनेमात दोघांमध्ये एक रोमॅंटीक अ‍ॅंगल दाखवण्यात आलाय. या सिनेमाचं लोकेशनही फायनल झालंय. अभिषेक हा सिनेमा चंबलच्या ख-या खो-यात शूट करणार आहे. जानेवारीमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. 


सुशांत सिंह राजपूतने सारा अली खानसोबतच्या ‘केदारनाथ’ची शूटिंग पूर्ण केलीये. तर भूमिने ‘टॉयलेट’ नंतर दुसरा कोणताही सिनेमा साईन केला नाही. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या दोघांची जोडी पडद्यावर काय करिश्मा करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.