सुशांत सिंग राजपूतला इंडस्ट्रीमध्ये कोण देत होतं सावत्रपणाची वागणूक?
सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गांभिर्याने चौकशी सुरू आहे.
मुंबई : सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गांभिर्याने चौकशी सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवसापासूनच दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जबाब महत्त्वाचा मानला जात आहे, कारण सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूर यांनी केलेलं ट्विट. सुशांतच्या दु:खाचा अंदाज आपल्याला होता, असं शेखर कपूर म्हणाले होते. आता शेखर कपूर यांनी मुंबई पोलिसांना ई-मेल करून आपला जबाब नोंदवला आहे या मेलमध्ये शेखर कपूर यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.
शेखर कपूर यांच्या पानी या चित्रपटात सुशांत प्रमुख भूमिकेत होता. यशराज बॅनरच्या अंतर्गत हा चित्रपट बनणार होता. आमची सहयोगी वेबसाईट Bollywoodlife.com ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठीच सुशांतने बाजीराव मस्तानी, रामलीला आणि पद्मावत यांच्यासह १० चित्रपटांना नकार दिला होता. पण मग पानी हा चित्रपटाचं काम कधीच सुरू का झालं नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला. शेखर कपूर यांनी या सगळ्याबाबत मुंबई पोलिसांना सविस्तर ई-मेल केला आहे.
काय म्हणाले शेखर कपूर?
पानी हे माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होतं. या चित्रपटावर मी १० वर्ष काम केलं. १५० कोटींच्या बजेटमध्ये होणाऱ्या या चित्रपटासाठी मी २०१२-१३ साली आदित्य चोप्रा यांची भेट घेतली. यानंतर २०१४ साली हा चित्रपट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनमध्ये ७ कोटी रुपये खर्चही करण्यात आला. तसंच सुशांत सिंग प्रमुख भूमिकेत असेल हेदेखील निश्चित झालं.
सुशांत या चित्रपटात गोरा नावाची भूमिका करणार होते. चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर सुशांतने जोरात तयारीही सुरू केली होती. यासाठी सुशांत प्रत्येक वर्कशॉपला जायचा, तसंच यशराज फिल्म्सच्या प्रत्येक प्रॉडक्शन मीटिंगला सुशांत जायचा, कारण चित्रपटातल्या सगळ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर त्याला लक्ष ठेवायचं होतं.
'पानी' बंद का झालं?
कलात्मक मतभेदांमुळे आदित्य चोप्रा यांनी हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. शेखर कपूर या चित्रपटात कोणताच बदल करायला तयार नव्हते, तर आदित्य चोप्रा यांना चित्रपटाच्या कथेत थोडे बदल करायचे होते. दोघांमध्ये एकमत न झाल्यामुळे हा चित्रपट अडकला.
शेखर कपूरसमोर सुशांत रडला
पानी चित्रपट बंद झाल्याची बातमी कळताच सुशांत अस्वस्थ झाला. सुशांत मला फोन करून रडायचा. सुशांत एवढा भावनिक झाला होता, की मला भेटल्यानंतर तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला, असा दावा शेखर कपूर यांनी केला आहे.
सुशांतसोबत सावत्र वागणूक
पानी चित्रपट बंद झाल्यानंतर शेखर कपूर लंडनला गेले. लंडनहून परत आल्यानंतर सुशांत आपल्याला भेटला, तेव्हा यशराजसोबतचा आपला करार संपल्याचं त्याने मला सांगितलं. तसंच इंडस्ट्रीमध्ये आपल्याला सावत्र वागणूक मिळत असल्याचंही सुशांत म्हणाल्याचा दावा शेखर कपूर यांनी या मेलमध्ये केला आहे.