सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी `या` नेत्याचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
सुशांत आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटीझ्म विरोधात जोरदार चर्चा सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येस लॉबिंग करणारी प्रोडक्शन हाऊस तसेच काही अभिनेत्यांना जबाबदार धरलं जातंय. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान लोक जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याप्रकरणी एक पत्र लिहिलंय. यामध्ये सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
मुळचा बिहारचा असलेल्या सुशांत आपल्या अभिनयामुळे देशभरात प्रसिद्ध होता. मी सुशांतच्या परिवाराच्या संपर्कात आहे. या आत्महत्येमागे काहीतरी असल्याचा त्याच्या जवळच्यांचे म्हणणे असल्याचे पासवान यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. भारतीय सिनेसृष्टीत नेपोटीझ्म, ग्रुपीझम असल्याने मोठ्या निर्मात्यांनी सुशांतला बॅन केलं होतं. यामुळे त्याच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे जवळ्यांचे म्हणणे आहे, असेही पासवान यांनी या पत्रात लिहिले.
याप्रकरणाचा गांभीर्याने तपास व्हायला हवा. तसेच छोट्या शहरातून आलेल्यांना पुढे जाण्यापासून रोखणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे पासवान यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. याआधी पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी सुशांतच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली.