`ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी 45 मिनिटं`; अभिनेत्रीनं सांगितली `दुसऱ्या जन्माची गोष्ट`
Actress On Her Second Birth Date: इन्स्टाग्राम बायोमध्ये तिने अचानक बदल करत आपली दुसरी जन्मतारीख असं म्हणत एक तारीख अपडेट केल्याने अनेक चाहते गोंधळून गेले.
Actress On Her Second Birth Date: अभिनेत्री सुष्मिता सेनने मागील आठवड्यामध्ये तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये 'माझी दुसरी जन्मतारीख' असं म्हणत एक अपडेट केलं. सुष्मिताने तिच्या इन्स्टा बायोमध्ये 'Second D.O.B: 27/02/2023' असं अपडेट केलं आहे. मात्र आता या तारखेशी सुष्मिताशी काय संबंध आहे असा प्रश्न पडला असेल तर या तारखेचा संबंध सुष्मिताबरोबर घडलेल्या एका घटनेशी जोडला जात आहे. अनेक चाहत्यांचा यामुळे गोंधळ उडाला असला तरी सुष्मिता सेनच्या या दुसऱ्या जन्मतारखेचा संबंध तिला हृदयविकाराचा झटका आल्याशी जोडला जात आहे. मागील वर्षी सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आळा होता. याबद्दल आता सुष्मिताने भाष्य केलं आहे. तिने पोस्ट केलेल्या नव्या व्हिडीओमुळे दुसऱ्या जन्मतारखेचं कनेक्शन या हृदयविकाराच्या झटक्याशी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ते माझ्या आयुष्यातील सर्वाधिक दिर्घकाळ टीकलेले 45 मिनिटं
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त सुष्मिताने एक व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्रामवर दुसरी जन्मतारीख अशी अपडेट का केली याबद्दलचा खुलासा केला आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सुष्मिताने, "माझं आयुष्य एक कथा आहे. ज्यामध्ये मी भूमिका साकारतेय आणि जगतेय. माझ्या आयुष्यात काही काळापूर्वी एक मोठा ट्विस्ट आला. हा तोच पॉइण्ट होता जेव्हा मला हृदयविकाराचा मोठा झटका आला होता. ते माझ्या आयुष्यातील सर्वात दिर्घकाळ राहिलेले 45 मिनिटं होते. हा तोच काळ होता जेव्हा मला वाटलं की आता माझी ही कथा संपली," असं म्हणताना दिसत आहे.
त्यांनी मला जगण्याची इच्छा सोडून दिली नाही
"मात्र माझ्या डॉक्टरांमुळे मी वाचले. त्याच्यामुळेच आजही माझी कथा सुरु आहे. त्यांनी मला जगवण्यासाठीचे प्रयत्न सोडले नाहीत. त्यांनी मलाही जगण्याची इच्छा सोडू दिली नाही. माझ्या आयुष्यासाठी त्यांनी नवी कथा लिहिली. त्यांनी मला नवी दिशा दिली. ती माझी दुसरी जन्मतारीख होती. मी तो दिवस आणि माझी संपूर्ण कथा डॉक्टरांना समर्पित करते," असंही सुष्मिताने म्हटलं आहे.
डॉक्टरांचे आभार
सुष्मिताने तिचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आणि आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत. "आजचा दिवस हा आभार मानण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. माझ्या डॉक्टरांनी मला दुसरा जन्म दिला. मला त्यांना माझ्या मनापासून आणि हृदयपासून धन्यवाद म्हणायचं आहे," असं सुष्मिता म्हणाली.
सेटवर आलेला हृदयविकाराचा झटका
मागील वर्षी फेब्रवारी महिन्यामध्ये सुष्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता. आर्या 3 च्या सेटवर तिला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वेळीच उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले होते. याचीच आठवण तिने डॉक्टर्स डेच्या निमित्ताने काढली.