शप्पथ! तुझ्या लग्नात नक्की येईन... तीन वर्षापूर्वी जेव्हा Swara ने Fahad ला दिली होती लग्नाची हिंट
Swara Bhaskar : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सपा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
Swara Bhaskar Wedding : बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) तिच्या चाहत्यांना एक मोठा सुखद धक्का दिला आहे. गुरुवारी सोशल मीडियावर स्वराने लग्न केल्याची घोषणा केली आहे. स्वराने सपा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांची जीवनसाथी म्हणून निवड केली आहे. फहाद आणि स्वरा यांची भेट कशी झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे झाले, ही सर्व माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक सुंदर मॉन्टेज व्हिडीओ बनवून शेअर केली आहे. स्वराने ही घोषणा केल्यानंतर चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
स्वराने कोर्टात स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत स्वराने 6 जानेवारीला लग्न केले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबत सर्वांना माहिती दिली. दुसरीकडे स्वराने ट्विट केलेल्या एका मॉन्टेज व्हिडीओमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची माहिती दिली आहे.
"कधी कधी काही गोष्टी सदैव आसपास असतात आणि तुम्ही त्यांचा दूरवर शोध घेता. आम्ही प्रेम शोधत होतो, पण सुरुवातीला मैत्री मिळाली. मग आम्ही एकमेकांना शोधले. फहाद झिरार अहमद, माझ्या हृदयात तुझं मनापासून स्वागत आहे. हे गोंधळलेले आहे पण ते तुझेच आहे," असे स्वराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. स्वराने व्हिडिओमध्ये तिच्या आणि फहादसोबत घालवलेले काही खास क्षण शेअर केले आहेत. त्यांच्या पहिल्या सेल्फीतून मैत्री कशी वाढली ते दाखवले आहे. त्याचबरोबर 6 जानेवारीला कोर्टात लग्नाची कागदपत्रे जमा केल्याचेही सांगितले आहे.
या सर्वांमध्ये स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक खास गोष्ट समोर आली आहे. फहाद अहमदने स्वराला तिच्या बहिणीच्या लग्नात येण्याचे आमंत्रण दिलं होतं. मात्र स्वराने शूटिंगचे कारण देत लग्नाला यायला जमणार नसल्याचे सांगितले होते. मात्र यावेळी तिने एक वचन दिलं होतं की मी तुझ्या लग्नात नक्कीच येईन. त्यामुळे या लग्नासोबत तिच्या या लव्हस्टोरीच्या व्हिडीओचीही चर्चा सुरुय.
कोण आहे फहाद अहमद?
फहाद अहमद हे समाजवादी पक्षाच्या युवा शाखेचे महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 1992 रोजी जन्मलेला फहाद मूळचा बरेली, उत्तर प्रदेशचे आहेत. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून (एएमयू) शिक्षण घेतल्यानंतर फहाद यांनी एमफिल करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स गाठलं आणि इथूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना, फहाद अहमद यांची स्टुडंट्स युनियनचे सरचिटणीस म्हणून निवड झाली आणि 2017 ते 2018 या कालावधीत त्यांनी या पदावर काम केले. फहाद अहमद सध्या येथून पीएचडी करत आहे.