मुंबई : मालिकांशी प्रेक्षकांचं आणि त्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं नातं हे निव्वळ शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. अशाच मालिकांच्या गर्दीत एक नाव घ्यायचं झालं तर ते म्हणजे 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचं. 
छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या मालिकेत महाराजांच्या कारकिर्दीवरही भाष्य करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेता शंतनू मोघे यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका उत्तुंग पर्वताप्रमाणे असणारी ही भूमिका पेलत शंतनू मोघे यानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रेक्षकांनीही या कलाकाराच्या कलेची दाद देत त्याला अतिशय मानाचं स्थान दिलं. 


शंतनूनं नुकत्याच पोस्ट केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्येही याचीच प्रचिती आल्याचं पाहायला मिळालं. अनपेक्षितपणे एका रिक्षावर महाराजांचं शंतनूनंच साकारलेलं रुप पाहायला मिळालं. यावेळी मोह न आवरल्यामुळं शंतनू थेट कारमधून खाली उतरला आणि त्यानं या रिक्षाच्या शेजारी उभं राहून फोटो काढला. 


 


'कामाची पावती..... अशी ही. जनमानसाचा पुरस्कारच जणू. स्वरूप वेगळं', असं लिहित शंततूनं आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. "स्वराज्य रक्षक संभाजी" ह्या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची भूमिका माझ्या वाट्याला आली हे माझं अहोभाग्य. मायबाप रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. तेव्हा, अनेक मित्र मैत्रीणनींनी असे फोटो मला पाठवले.वेगवेगळ्या ठिकाणी, ट्रॅफिक मधे असताना रिक्षा वर दिसलेलं हे चित्र. मनोमन सुखावून गेलो. मनात आलं, आपल्याला ही हे चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळेल का? आणि एके दिवशी, मी सिग्नल वर गाडीत असताना,प्रिया नी मला अचानक  समोरची रिक्षा दाखवली.. पटकन गाडीतून उतरलो आणि एक फोटो काढला.. हा मोह आवरू शकलो नाही, असं त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं. डॉ. अमोल कोल्हे यांचे त्यानं आभारही मानले.