तान्हाजी सिनेमातील `चुलत्या` साकारणारा मराठमोळा अभिनेता
``शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला` नाटकात काम केलंय
मुंबई : अजय देवगणनचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठा वीर योद्धा तान्हाजी मालुसरेंचं शौर्य या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आलं आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील आपली कमाल दाखवली आहे. दोन आठवड्यात तान्हाजी सिनेमाने 125 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात अजय देवगन, काजोल, शरद केळकर आणि सैफ अली खानसोबतच लहान भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची देखील जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये चर्चा होतेय मराठमोळा अभिनेता कैलास वाघमारेची.
या अभिनेत्याने सिनेमात 'चुलत्या' हे पात्र साकारलं आहे. विनोदी असले तरीही नकारात्मक शेड दाखवणारे हे पात्र आहे. महत्वाचं म्हणजे सिनेमा संपल्यावर मोठ्या अभिनेत्यांसोबत या अभिनेत्याचे काम देखील प्रेक्षकांच्या मनावर गारूड घालतो.
कैलास वाघमारेने 'शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला' या नाटकात काम केलं आहे. या नाटकात त्याने कट्टर मावळ्याची भूमिका साकारली आहे. तसेच 'मनातल्या उन्हात' या सिनेमातून मराठी सिनेसृष्टी त्याने पाऊल ठेवलं. या सिनेमात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच 'हाफ तिकीट', 'ड्राय डे', 'भिकारी' यासारख्या सिनेमातही कैलासने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
तान्हाजी सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाला देखील मागे टाकलं आहे. ओम राऊत दिग्दर्शित सिनेमावरून सुरूवातीला वाद झाला पण त्यानंतर या सिनेमाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. दोन आठवड्यानंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवत आहे.