नानांच्या प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीनं केलं हे वक्तव्य
प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीने पुन्हा नानावर निशाणा साधलाय.
मुंबई : तनुश्री दत्ताने केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. पण प्रेस कॉन्फरन्स आधीच तनुश्रीने पुन्हा नानावर निशाणा साधलायं. मी कॅमेराच्या डोळ्यात डोळे टाकून सर्व प्रश्नांचं उत्तर देईन या नाना पाटेकरांच्या वक्तव्यावर हसू येत असल्याचंही ती म्हणतेय.
काय घडलंय ?
‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर जवळपास दहा वर्षांपूर्वी नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. यानंतर तनुश्री आणि नानांच्या बाजूने बोलणारे असे दोन गट बॉलीवुडमध्ये पाहायला मिळाले. नाना पाटेकरांनी सर्व आरोप फेटाळून जर तिला असं वाटत असेल तर तिने कायद्याने कारवाई करावी.
10 वर्षांनी लावलेल्या आरोपावर नाना म्हणाले की, एक व्यक्तीने अशा पद्धतीने वक्तव्य केल्यावर मी काय बोलणार? लैंगिक अत्याचार म्हणजे काय? एकाचवेळी आमच्यासोबत सेटवर 200 हून अधिक लोकं असायची. त्यामुळे मी देखील कायद्याने काय करता येईल हे बघेन असं नानांनी म्हटलं होत.
नाना सध्या 'हाऊसफुल 4' व्यस्त शुटींगमधून बाहेर पडल्यानंतर नाना प्रेस कॉन्फरन्स घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्याआधीच तनुश्रीने नानांवर आणखी गंभीर आरोप केले आहेत.
'नानाला पुरस्कार द्या'
सर्व पत्रकारांनी या प्रेस कॉन्फरन्सला जायला हवं. नाना एक खूप चांगला अभिनेता आहे. त्यामुळे त्या अभिनयाची झलक सर्वांना तिथे पाहायला मिळणार आहे. यासाठी एक खास पुरस्कारही त्याला द्यायला हवा असं तिने सांगितलं. तू माझ्या मुलीसारखी आहेस असं 10 वर्षापूर्वीही नानाने मला म्हटलं होतं असे तनुश्रीने सांगितलं.
गंभीर आरोप
नाना पाटेकर सेटवर अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करतात, अनेकींना त्यांनी मारहाण केली आहे. कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, मात्र त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणीच करत नाही असा आरोप तिने केला होता.