`तारे जमीन पर`चा ईनू 17 वर्षांनंतर पुन्हा आईला भेटला अन... ; Video पाहून चाहतेही आठवणीत रमले
आमिर खानच्या `तारे जमीन पर` या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने चित्रपटातील ईशान अवस्थी आणि त्याची आई माया अवस्थी यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते दर्शील सफारी आणि टिस्का चोप्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमिर खानच्या तारे जमीन पर या चित्रपटाला 21 डिसेंबर रोजी 17 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे अलीकडेच या चित्रपटात ईशान अवस्थी आणि त्याची आई माया अवस्थी यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते दर्शील सफारी आणि टिस्का चोप्रा यांचा व्हिडीओ पाहायला मिळाला. 'तारे जमीन पर'ला 17 वर्षे पूर्ण झाल्याच्या एका आठवड्यानंतर दोन्ही स्टार्सनी स्वतःच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांना जुन्या दिवसांची आठवण झाली. या मजेदार व्हिडीओने चाहत्यांना आनंद दिला. परंतु नेटकऱ्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या कथेची खिल्ली उडवलेली पाहून त्यांना फटकारले. व्हिडीओवरील कमेंट्समध्ये प्रतिक्रियांचा पूर आला आहे, ज्यामुळे 'तारे जमीन पर' पुनर्मिलन व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री टिस्का चोप्रा कॅमेऱ्यासमोर दोन नोट्स दाखवताना दिसत आहे. एका नोटमध्ये डाळ, भात आणि भाजीचे घरगुती जेवण आहे, तर दुसऱ्या नोटमध्ये पिझ्झा, पास्ता, आईस्क्रीम असे जंक फूड लिहिले आहे. दर्शील सोफ्यावर बसलेला आहे आणि त्याच्या हातात उलटं पुस्तक दिसत आहे. न पाहता तो जंक फूडचा पर्याय निवडतो.
पण व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, स्नॅक लिस्टमधील नोट निवडूनही दर्शील एका ताटात डाळ, भात आणि भाजीचा आस्वाद घेताना दिसतो. या मजेदार घटनेवर प्रतिक्रिया देताना टिस्का म्हणते, 'अजूनही तो वाचू शकत नाही.' दर्शील सफारीच्या तारे जमीन पर चित्रपटातील व्यक्तिरेखा अशी आहे की तो डिस्लेक्सियाने ग्रस्त एक मुलगा आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये त्याच्या कला शिक्षक राम शंकर निकुंभ (आमिर खान) याला भेटल्यानंतर त्याचे जीवन बदलते.
हा व्हिडीओ शेअर करताना टिस्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तारे जमीन पर'ची 17 वर्षे.' पुढे टिस्काने लिहिले, 'आम्हाला माहित आहे की डिस्लेक्सिया ही एक गंभीर समस्या आहे जी केवळ डिस्लेक्सियाने पीडित व्यक्तीलाच नाही तर कुटुंबांवर देखील प्रभावित करते. हा व्हिडीओ केवळ विनोदासाठी आहे.' दर्शीलने या व्हिडीओवर कमेंटमध्ये लिहिले आहे, 'हाहाहाहा आता तुम्ही थांबाचं.' हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी, एका नेटकऱ्याने लिहिले की, हे खूप दुःखदायक आहे. शेवटी सहानुभूती आणि समजूतदारपणाचा संदेश विनोदात बदलला जात आहे.'