जाणून घ्या `इतकं` वजन कमी करणाऱ्या राम कपूरच्या डाएट प्लॅनविषयी...
त्याची दोन रुपं पाहायला मिळत आहेत.
मुंबई : 'बडे अच्छे लगते है' या मालिकेतून अभिनेता राम कपूर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला. यापूर्वीही विविध मालिकांतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. टेलिव्हिजन विश्वात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही रामची ओळख आहे. पण, सध्या मात्र तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती चर्चा आहे, रामच्या नव्या आणि तितक्याच प्रभावी लूकची.
अस्सल पंजाबी कुटुंबातील असणाऱ्या रामने गेल्या काही दिवसांमध्ये त्याच्या शारीरिक सुदृढतेला महत्त्वं दिलं होतं. ज्याचे परिणामही सर्वांसमोर आहेत. खुद्द रामनेच त्याचा जुना आणि नवा, असे दोन्ही फोट पोस्ट केले आहेत. यामध्ये स्थूल राम कपूर ते सुदृढ राम कपूर अशी त्याची दोन रुपं पाहायला मिळत आहेत.
अभिनयाकडे अतिशय गांभीर्याने पाहणाऱ्या रामची ही जिद्द आणि चिकाटी पाहून अनेकांनीच त्याचं कौतुक केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाकडून त्याच्या व्यायामाविषयी आणि आहाराच्या सवयींविषयी काही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
४५ वर्षांचा राम कपूर त्याच्या दिवसाची सुरुवातच व्यायामशाळेतून, (जीम)मधून करतो. त्याआधी तो कोणत्याही खाद्यपदार्थांचं सेवन करत नाही.
असा आहे रामचा डाएट प्लॅन
जवळपास १६ तासांसाठी राम काहीच खात नसे. शिवाय खाण्यातून किती कॅलरी शरीरात जात आहेत यावरही त्याचं लक्ष असतं. सूत्रांच्या माहितीनुसार थोडक्यात बऱ्याच अंशी खाण्याचं प्रमाण कमी करत रामने त्याचं वजन कमी केलं. ज्यामध्ये ठराविक वेळेला ठराविक प्रमाणातच आहाराचं सेवन केलं जातं.
काय खावं किंवा काय खाऊ नये याऐवजी कोणत्या वेळी खाद्यपदार्थांचं सेवन करावं, यावर त्याच्या डाएटचा भर होता. पण, जितक्या निर्धारित वेळासाठी त्याने काहीही न सेवन करण्याचं ठरवलं होतं, त्यामध्ये मात्र काहीच न खाण्याला त्याचं प्राधान्य होतं.
रामने १६/८ अशा प्रमाणात या वेळा ठरवल्या होत्या. आहाराच्या या सवयी आणि काटेकोरपणे त्यांचं पालन करतच रामने जवळपास ३० किलो वजन घटवलं.