मुंबई : 'कथा कहे सो कथक कहलावे...' कथा म्हणजे गोष्ट, गोष्टीच्या माध्यमातून कथक कलाकार त्यांच्या नृत्य कलेचा आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करतात, आणि त्या गोष्टी मागचं रहस्य प्रेक्षकांना पटवून देतात. कथक नृत्य प्रकाराला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. काळानुसार या नृत्य प्रकाराचे महत्व वाढताना दिसत आहे. हीच परंपरा जपत आता एक टेलिव्हिजन अभिनेता या नृत्यकलेचे धड़े गिरवताना दिसणार आहे. विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेला हा अभिनेता म्हणजे गौतम रोडे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सरस्वतीचंद्र', 'महा कुंभ: एक रहस्य' यांसारख्या गाजलेल्या मलिकांमध्ये भूमिका साकारणारा गौतम लवकरच कथक नृत्य करणार आहे. नृत्यकलेच्य़ा या विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 'आरोही' नाटकाच्या माध्यमातून तो रंगमंच गाजवण्याच्या तयारीत आहे. नाटकाचे दिग्दर्शन सलीम अख्तर यांनी केले आहे. ताल, लय, बोल एकाच साचात बांधलेले कथक नृत्य फार कठीण असल्याचं गौतमने 'डीएनए'शी संवाद साधताना स्पष्ट केलं.
 



''मी 'आरोही' नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर पदार्पण करणार आहे'', असं तो म्हणाला. आपण डान्सर नसल्याचे सांगत त्याने या कलेचं रितसर प्रशिक्षण घेत असल्याची माहिती दिली. 'मी कथक नृत्यामध्ये पारंगत नाही. पण गेल्या दीड महिन्यापासून मी कथक नृत्याचे धडे गिरवत आहे. या नाटकामध्ये तब्बल २ मिनिटे मी कथक नृत्याच्या तालावर थिरकणार आहे आणि पुढे कथक नृत्यात अग्रेसर असलेल्या आरोहीसोबत देखील नृत्य करणार आहे', असं गौतम म्हणाला. 



गौतमसोबत नृत्य सादर करणारी आरोही ही वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षापासून कथक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. या नाटकाच्या माध्यमातून गौतम नृत्यासाठी धडपडत असलेल्या एका मुलाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. या निमित्ताने त्याची नृत्यकलेतील रुचीही सर्वांसमोर आली. 'अभिनय करण्यात मला फार रस आहे, पण कथक शिकणं माझ्यासाठी फार कठीण आहे. त्याचप्रमाणे कथक भारत देशातील शास्त्रीय नृत्यशैलींपैकी एक आहे आणि मला संस्कृतीच्या वारसा हक्क असलेल्या नृत्यामध्ये गोंधळ घालायचा नाही', असं म्हणाऱ्या गौतमने शिवधनुष्यच पेललं आहे, हे म्हणणं वावगं ठरणार नाही.