सावत्र वडिलांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीविषयी अभिनेत्रीच्या मुलीचा मोठा खुलासा
त्या व्यक्तीने आपल्याला.....
मुंबई : टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिच्या खासगी आयुष्याच्या बऱ्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. कला वर्तुळातही या चर्चांकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. श्वेता तिवारी हिच्या दुसऱ्या पतीने तिच्या मुलीविषयी आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीप्पणी केल्याबद्दल आणि तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आपल्या कुटुंबाविषयी विशेष म्हणजे आईविषयी आणि या संपूर्ण प्रसंगाविषयी होणाऱ्या चर्चा पाहता श्वेताची मुलगी, पलक तिवारी हिने काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे.
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पलकने काही प्रसंगांवरुन पडदा उचलला. फक्त पूर्ण काळ्या रंगाची एक फ्रेम पोस्ट करत पलकने त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये अभिनव कोहलीविषयी एक बाब स्पष्ट केली. त्या व्यक्तीने आपल्याला किंवा आईला मारहाण न केल्याचं ती म्हणाली. श्वेताला मारहाण केल्याच्याच चर्चा प्राथमिक स्वरुपात अनेकांचं लक्ष वेधत असल्याचं पाहात, तिने या चर्चा आणि त्यासंबंधीची माहिती चुकीची असल्याचं म्हणत आपली आई ही आतापर्यंतची आपल्या पाहण्यात आलेली सर्वात खंबीर महिला असल्याचंही ती म्हणाली.
'(फक्त तो दिवस जेव्हा तक्रार दाखल करण्यात आली तो वगळता) माझी आई नव्हे तर, मी पलक तिवारी अनेकदा घरगुती गैरवर्तणुकीची शिकार झाले होते', ही बाब तिने या पोस्टमधून अधोरेखित केली आहे. अभिनव कोहलीने कधीही माझा शारीरिक विनयभंग केला नाही किंवा मला चुकीचा स्पर्शही केला नाही हा खुलासाही तिने केला. शिवाय त्याने चुकीचा स्पर्श केला नसला तरीही चुकीच्या पद्धतीने आणि अश्लील भाषेत टीप्पणी केल्याचं म्हणत मी आणि माझी आईच नव्हे तर इतर कोणतीही महिला असती तर तिचीही मान शरमेनं खाली गेली असती, असं पलक या कॅप्शनच्या माध्यमातून म्हणाली.
वडिलांच्या स्थानी असणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची वागणूक मिळाल्याप्रकरणी तिने या पोस्टमधून नाराजी व्यक्त केली. शिवाय आईने म्हणजेच अभिनेत्री श्वेता तिवारी हिने तिच्या वैवाहिक आयुष्यात दोन्ही वेळेस ज्या परिस्थितीचा सामना केला आहे आणि ती या प्रसंगांमध्येही एखाद्या पुरुषाप्रमाणेच धीराने उभी राहिली आहे याचा आपल्याला प्रचंड आदर वाटत असल्याची भावना तिने मांडली.