मुंबई : देशात सर्वत्र नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याच चर्चा सुरु असताना मंगळवारी अभिनेता सुशांत सिंह याने ट्विट करत अनेकांचं लक्ष वेधलं. बऱ्याच वर्षांपासून तो ज्या टेलिव्हिजन कार्यक्रमाशी जोडला गेला होता, त्याच 'सावधान इंडिया' या कार्यक्रमाचा आपण यापुढे भाग नसल्याचं त्याने सांगितलं. ही माहिती मिळताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात करण्यात येणाऱ्या निदर्शनात सहभागी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं कार्यक्रमाशी असणारं नातं तुटलं. त्यामुळे आता त्याच्या सहभागामुळेच ही कारवाई झाल्याचं म्हटलं जात आहे. या साऱ्यातच आपल्या आगामी, 'रंगबाज फिरसे' या प्रोजेक्टविषयी 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना त्याला 'सावधान इंडिया'तून काढता पाय घेण्याविषयीसुद्धा विचारण्यात आलं. 


'मला काल रात्रीच या कार्यक्रमाशी असणारा माझा करार संपवण्यात आल्याचं कळलं. बहुधा या योगायोगही असूच शकतो की ज्या दिवशी मी निदर्शनांमध्ये सहभागी झालो त्याच दिवशी हे घडलं. मला खरंच त्यामागचं कारण माहित नाही. पण, वाहिनीला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बदलण्याचे सर्व अधिकार आहेत', असं सुशांत म्हणाला. 


मुख्य म्हणजे सत्य बोलण्याची ही छोटीशी किंमत फेडावी लागल्याचं उत्तर सुशांतने त्याच्या एका फॉलोअरला दिलं. याचविषयी विचारलं असता तो म्हणाला, 'हो कारण जर हे माझ्या क़ृतीवरील परिणामही असतील तर ही अतिशय कमी किंमत असेल जी मी फेडली. सध्या जे काही सुरु आहे त्यामुळे मी हादरुन गेलो आहे आणि माझ्या कृतीविषयी मला काहीच पश्चाताप नाही'.



सध्याच्या घडीला काही सेलिब्रिटींनी या प्रकरणी मौन राहणं पसंत केलं आहे. त्याविषयीच सांगताना ज्यांना हे सर्व चुकीचं वाटलं त्यांनी याविरोधात आवाज उठवला, ज्यांना चुक नाही वाटली ते शांत राहिले. अखेरीस हा प्रत्येकाचा निर्णय असल्याचं स्पष्ट केलं. काम गमावून बसण्याच्या भीतीने मी काही इतरांच्या निर्णयांवर प्रतिक्रिया देणार नाही, असं तो म्हणाला. 


'ते दहशतवादी नव्हे, विद्यार्थी आहेत', जामिया प्रकरणी बॉलिवूडकरांचा संताप 



'मी एका तत्वावर चालतो. मी माझं कौशल्य विकतो पण, माझी सदसदविवेकबुद्धी नाही. त्यामुळे उद्या जेव्हा विद्यार्थांना या साऱ्याचा सामनवा करावा लागत होता तेव्हा तुम्ही कुठे होतात असं माझी मुलं मोठी होऊन विचारतील तेव्हा किमान माझ्याकडे उत्तर तर असेल', अशी ठाम भूमिका त्याने मांडली. विद्यार्थी हेच राष्ट्राचं भविष्य असल्याचं सांगत त्यांच्यासोबत घडणाऱ्या या घटनांवर आपण शांत राहणं निव्वळ अशक्य असल्याचीच बाब त्याने अधोरेखित केली.