मुंबई : 'उतरन' या मालिकेतून प्रकाशझोतात आलेल्या अभिनेत्री रश्मी देसाई हिने अवघ्या काही काळातच टेलिव्हिजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. रश्मीने साकारेल्या 'तपस्या' या भूमिकेला नकारात्मक झाक असली तरीही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली होती. या मालिकेनंतर 'दिल से दिल तक' या मालिकेतूनही ती झळकली होती. पण, २०१८ मधील या मालिकेनंतर मात्र रश्मी कलाविश्वात तुलनेने फार कमीच दिसली. 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द रश्मीनेच यामागचं खरं कारण उघड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून आपण प्रकृतीच्या कारणांमुळे या कलाविश्वापासून दूर असल्याचं तिने सांगितलं. 'गेल्या वर्षी, डिसेंबर महिन्यात मला सोरायसिस आजार असल्याचं निदान झालं. या आजारातून बाहेर येण्यासाठी बराच वेळ जातो. कित्येकदा तो पूर्णपणे बराही होत नाही. गेल्या चार महिन्यांपासून मी स्टेरॉईड उपचारांवर आहे. ज्यामुळे माझं वजनही वाढलं आहे. उन्हात जाण्याची मला परवानगी नाही, असं केल्यास अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे', असं ती म्हणाली. हे सारंकाही तणावामुळेही होत असल्याचं तिने स्पष्ट केलं. पण, अशा परिस्थितीत तणावापासून दूर राहणं निव्वळ अशक्य असल्याची बाबही तिने नाकारली नाही. 'मी एक अभिनेत्री आहे आणि या क्षेत्रात कलाकाराचा चेहराच सर्वकाही असतो', ही वस्तूस्थिती तिने मुलाखतीदरम्यान सर्वांसमोर ठेवली. 


आजारपणाविषयी कोणालाही काहीच न सांगण्याचा सल्ला रश्मीच्या मित्रमंडळींनी तिला दिला होता. पण, हा आजार बरा होऊ शकतो आणि त्याविषयी इतरांना काही सांगण्यात कोणताही संकोचलेपणा वाटता कामा नये, अशीच भूमिका तिने स्पष्ट केली. बऱ्याच कलाकारांनी या आजाराचा सामना केला असून, त्यांनी मात्र याविषयी मौन बाळगल्याचीही माहिती तिने दिली. 


करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच आजारपणामुळे या क्षेत्रातून काहीसं दूर राहणारी रश्मी येत्या काळात पुन्हा या क्षेत्रात परतण्याचा मनसुबा बाळगत असून, बरीच आशावादी आहे. यामध्ये तिला गरज आहे ती म्हणजे चाहत्यांच्या साथीची.