महेश कोठारेंची नात प्राणी- पक्ष्यांचे आवाज काढते तेव्हा...
हुश्शार जिजा....
मुंबई : मराठी कलाविश्वात निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या महेश कोठारे यांच्यावर आता आणखी एक जबाबदारी आहे. ही जबाबदारी काहीशी अधिक महत्त्वाचीच म्हणावी लागेल. कारण, यामध्ये त्यांना चक्क आपल्या नातीचे लाडही पुरवावे लागत आहेत. आजोबांची लाडकी आणि आई-बाबांच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या जिजाचा वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
झी मराठी या वाहिनीवरील 'अळीमिळी गुपचिळी' या कार्यक्रमामध्ये जिजाने तिच्या गोंडस अंदाजात सर्वांनाच घायाळ केलं. 'अग्गंबाई सासुबाई' या गाण्यावर तिचं ठेका धरणं असो किंवा मग आईसोबत बडबडगीतांमध्ये सूर मिसळणं असो. कोठारेंचीही ही नात बालपणापासूनच सर्वांवर प्रभाव पाडत आहे.
जिजाच्या या अंदाजाची एक झलकही या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळाली. जेथे तिने चक्क विविध प्राणी आणि पक्ष्यांचे आवाजही करुन दाखवले. माशाचं तोंड कसं असतं असं विचारलं असता जिजाने लगेचच तशी नक्कल केली. तर, या चिमुकलीने तिच्याच आवाजात वाघाप्रमाणे डरकाळीही फोडली बरं.
पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत
कोकीळेपासून चिऊताईपर्यंत, आई सांगेल त्या प्राण्याचा आणि पक्ष्याचा आवाज काढणाऱ्या या जिजाचं चातुर्य सर्वांनाच थक्क करुन गेलं. यावेळी 'अळीमिळी गुपचिळी'च्या खास भागात आदिनाथ कोठारे, उर्मिला कानिटकर यांच्यासह महेश कोठारेंचीही उपस्थिती होती. जिजाचा हा अंदाज त्यांच्यासाठी सवयीचा असला तरीही इतक्या साऱ्यांसमोरही तिचा आत्मविश्वास कुटुंबीयांनाही थक्क करुन गेला.