नवी दिल्ली : तेलुगू टेलिव्हिजन अभिनेत्री नागा झांसी हिने बुधवारी हैदराबाद येथे आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीनगर कॉलनीतील एका इमारतीत २१ वर्षीय नागा झांसीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्येवळी अभिनेत्री घरात एकटीच होती. नागा झांसीचा भाऊ दुर्गा प्रसाद घरी पोहचल्यावर कोणीही दरवाजा न उघडल्याने याबाबत शेजाऱ्यांना विचारण्यात आले. परंतु त्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा उघडताच अभिनेत्री नागा झांसीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत समोर आला. दरम्यान, नागा झांसीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी गांधी रूग्णालयात पाठवण्यात आला असून पुंजागुट्टा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 


आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात राहणाऱ्या झांसीने 'पवित्र बंधन' यासारख्या मालिकांसह अनेक मालिकांमधून काम केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती अमीरपेट भागात ब्यूटी पार्लर चालवत होती. 


झांसीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे एका  तरूणाशी प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून ती तणावाखाली होती. प्रेमप्रकरणातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. झांसीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून पोलीस कॉल डेटा आणि चॅट रेकॉर्ड्सची तपासणी करत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणतेही पुरावे किंवा माहिती मिळाली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.