संवेदनशील, बंडखोर अन्... `द आर्चिज`चा ट्रेलर प्रदर्शित; स्टार किड्सच्या मुलांना अभिनय जमतोय का? पाहा Video
The Archies Trailer: तरूणाईचे चित्रपट पाहायला आपल्याला आजही आवडतात. त्यामुळे अशा चित्रपटांची जोरात चर्चा रंगलेली असते. असाच एक नवाकोरा चित्रपट हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे ज्याचं नावं आहे `द आर्चिज`. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
The Archies Trailer: 'आपण आपलं 25 टक्के आयुष्य हे जगलो आहोत; पण आपण केलं काय?' 1964 सालातल्या टीनेजर्सना पडलेला हा प्रश्न आणि त्यांच्या आयुष्यात मांडून ठेवलेल्या अनेक घडामोडींची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे 'द आर्चिज'. सोबतच मैत्री, त्या काळातील आजूबाजूची परिस्थिती, प्रेम, पालकांशी असलेलं नातं, बंडखोर वृत्ती आणि मुक्त आयुष्य जगण्याची मुभा या सगळ्या पैलूंवरती हा चित्रपट फिरताना दिसतो. नुकताच त्याचा ट्रेलर हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'द आर्चिज' हे जगप्रसिद्ध पाश्चिमात्त्य कॉमिक आहे. तरूण तसेच लहान मुलांमध्ये हे कॉमिक प्रचंड प्रसिद्ध आहे. 1942 साली पहिल्यांदा हे कॉमिक प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर हळूहळू हे कॉमिक सर्वत्र जगभर पसरू लागले. आता भारतातही या कॉमिकवरील द आर्चिज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या 7 डिसेंबर रोजी येतो आहे.
गेल्या वर्षभरापासूनच या चित्रपटाची जोरात चर्चा होती. खुशी कपूर (श्रीदेवी-बोनी कपूर यांची मुलगी), सुहाना खान (शाहरूख खानची मुलगी), अगस्त्या नंदा (अमिताभ बच्चन यांचा नातू) हे तीन स्टार कीड्स या चित्रपटातून डेब्यू करणार आहेत. त्यांच्या अभिनयाची पहिली झलक ही ट्रेलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. त्यांच्यासोबतच वेदांग रैना, मिहीर अहुजा, युवराज मेंदा, अदिती डॉट हे देखील मुख्य भुमिकांतून दिसणार आहेत. यावेळी सुहाना खान ही वेरोनिका लॉजच्या भुमिकेत आहे. अगस्त्या नंदा हा आर्ची अॅन्ड्रुजच्या भुमिकेत आहे. खुशी कपूर ही बेटी कुपरच्या भुमिकेत आहे. या तिघांच्या प्रमुख भुमिका आहेत. ज्यांच्यात एकप्रकारे लव्ह ट्रॅंगल आहे. सोबतच मिहीर अहुजा जगहेड, अदिती डॉट ही इथेन मग्स आणि युवराज मेंदा हा डिल्टन डॉईलेच्या भुमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहे. जे या आर्चिज कॉमिकमधील सर्वात लोकप्रिय पात्रं आहेत.
हेही वाचा : 'तू कधीच हिरोईन होणार नाहीस', 'या' अभिनेत्याने नीना गुप्ताला मारला होता टोमणा?
या चित्रपटातील 'सुनोह' आणि 'वा वा वूम' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. ही गाणी सुप्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत. सध्या ही गाणी सर्वत्र लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळे या गाण्यांचीही चर्चा आहे.
सध्या समोर आलेल्या ट्रेलरमधून दिसते की शहरीकरणाचा मुद्दा जेव्हा सुरू झाला होता तेव्हा त्याविरूद्ध जाण्यासाठी हे मित्र पुढाकार घेतात. झाडं तोडून त्याजागी इमारत बांधण्याचा मुद्दा सध्या थग धरून आहे त्याविरूद्धच तेव्हाच्या तरूण पिढीची लढ्याची गोष्ट ही प्रेक्षकांच्यासमोर येताना दिसते आहे. त्यातून त्यांची मैत्रीही समोर येणार आहे. तुम्ही द आर्चिजचा ट्रेलर पाहिलात का?