देहरादून : देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या 'महावीर चक्र' विजेते योद्धे जसवंत सिंह यांच्या आयुष्यावर आणि मृत्यूवर बेतलेली कथा असलेला '७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड' हा सिनेमा आज देशभरात प्रदर्शित होतोय. १९६२ च्या भारत - चीन युद्धात शत्रुला एकट्यानं तब्बल ७२ तास थोपवून धरणाऱ्या जसवंत सिंह रावत यांची कहानी या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. महावीर सिंह यांनी शत्रुला केवळ रोखलंच नाही तर जवळपास शत्रूदलाच्या ३०० सैनिकांचा खात्मा त्यांनी केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या सिनेमाद्वारे १९६२ चं भारत - चीन युद्धाच्या आठवणी प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा नव्यानं जाग्या होणार आहेत. 


'७२ अवर्स : मार्टायर हू नेव्हर डाईड' या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अविनाश ध्यानी यांनी केलंय. एवढंच नाही तर अविनाश ध्यानी हेच या सिनेमात जसवंत सिंह रावत यांच्या भूमिकेत दिसत आहेत. 


या सिनेमाचं शुटींग उत्तराखंडात चकराता, गंगोत्री, हर्सिल आणि हरियाणाच्या रेवाडीमध्ये पार पडलंय. जेएसआर प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सिनेमासाठी तब्बल १२ करोड रुपयांचा खर्च झालाय. 



जसवंत सिंह रावत यांचा परिचय 


पौढी गढवालच्या बाडियू गावात १५ जुलै १९४१ रोजी गुमान सिंह रावत आणि लाला देवी यांच्या घरी जसवंत सिंह यांचा जन्म झाला होता. सात भावंडांत जसवंत सर्वात मोठे होते. १६ ऑगस्ट १९६० रोजी ते सेनेत भर्ती झाले. त्यांची आठवण सांगताना भरलेल्या डोळ्यांनी छोटे भाऊ विजय सिंह सांगतात की, सेनेत भर्ती झाल्यानंतर केवळ एकदाच सुट्टी घेऊन ते घरी आले होते... त्यानंतर जसवंत गेले ते परत माघारी न येण्यासाठी... जसवंत सिंह यांचे भाऊ आजही देहरादूनमध्ये राहतात. आपल्या भावाला आजही 'परमवीर चक्र' न दिलं गेल्याची मनातली सल ते अनेकदा बोलून दाखवतात.


भारत-चीन युद्धातील पराक्रम


भारत - चीन युद्धादरम्यान जसवंत सिंह चौथ्या गढवाल रेजिमेंटमध्ये तवांग जिल्ह्याच्या नुरांग पोस्टवर तैनात होते. प्रबळ चीनसमोर भारत प्रत्येक गोष्टीत मागे पडत होता. नुरांग पोस्टवर जसवंत सिंह यांच्या बटालियनला मागे हटण्याचे आदेशही मिळाले होते. परंतु, जसवंत सिंह यांनी मात्र आपले दोन सहकारी गोपाल सिंह गुसाई आणि त्रिलोक सिंह नेगी यांच्यासोबत त्याच पोस्टवर थांबण्याचा निर्णय घेतला. तिघांनी मिळून चीनी सैनिकांच्या एका बंकरवर हल्ला करत त्यांची मशीनगन मिळवली.


यानंतर चीनच्या संपूर्ण तुकडीनं हल्ला केल्याचं लक्षात येताच जसवंत सिंह यांनी आपल्या दोन्ही सहकाऱ्यांना तिथून निघून जाण्याचे आदेश दिले. ते एकट्यानंच तब्बल ७२ तासांपर्यंत शत्रुवर गोळ्या झाडत सीमेचं रक्षण करत राहिले. यावेळी जसवंत सिंह यांना सैला आणि नुरा नावाच्या दोन स्थानिक तरुणींचीदेखील साथ मिळाली.


मंदिर आणि जसवंतगड


ज्या स्थानावर जसवंत सिंह शहीद झाले तिथंच एक मंदिर उभारण्यात आलंय. हा संपूर्ण भाग जसवंतगड म्हणून ओळखला जातो. सेनेची एक तुकडी या ठिकाणी १२ महिने तैनात असते. मृत्यूनंतर आजही जसवंत सिंह यांचा आत्मा देशाच्या सिमेचं रक्षण करतोय, असंही मानलं जातं.