The Kapil Sharma Show मध्ये काम केलेल्या हास्य कलाकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिर्थानंद (Teerthanand) फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करत आत्महत्येचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी हातात फिनाइलची बाटलीही घेतली होती. यादरम्यान, फेसबुकवरील त्यांच्या काही मित्रांनी त्यांच्या घराजवळील पोलीस ठाण्यात फोन करुन याची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्महत्येचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ तीर्थानंद यांच्या घरी पोहोचले. यानंतर त्यांनी तीर्थानंद यांना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती देताना पोलीस कॉन्स्टेबर मोरे यांनी सांगितलं आहे की "फोन आल्यानंतर आम्ही तात्काळ मीरा रोडच्या शांतीनगर येथील बी 51 बिल्डिंगच्या फ्लॅट क्रमांक 703 मध्ये पोहोचलो. यावेळी फ्लॅटचा दरवाजा उघडाच होता. तसंच आत खोलीत एक श्वान होता. आम्ही आवाज दिला असता तीर्थानंद बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यानंतर आम्ही तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं".


नेमकं प्रकरण काय?


तीर्थानंद यांनी एका महिलेला आपल्या स्थितीसाठी जबाबदार धरलं आहे. तीर्थानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्व एका महिलेशी माझी भेट झाली होती. तिला दोन मुली आहेत. आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. यादरम्यान मला ती देहविक्री करत असल्याची माहिती मिळाली. मला तिच्यापासून सुटका करुन घ्यायची होती. पण तिने मला धमकावण्यास सुरुवात केली. तीच मला तुझ्यावर गुन्हा दाखल करेन अशी धमकावू लागली होती. गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने बऱ्याच दिवसांपासून मी पळ काढत आहे. मी अनेक दिवस आपल्या घरीही जाऊ शकलो नाही. अनेकदा तर फुटपाथवर झोपण्याची वेळ आली. मी आता या सर्व गोष्टींना कंटाळलो आहे. यामुळेच आता मी स्वत:ला संपवण्याचं ठरवलं आहे. 



ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून इंडस्ट्रीत ओळख


तीर्थानंद यांना चित्रपटसृष्टीत नाना पाटेकर यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावरही त्यांचं नाव ज्युनिअर नाना पाटेकर आहे. त्यांनी अनेकदा नाना पाटेकर यांचा बॉडी डबल म्हणून काम केलं आहे. याशिवाय तीर्थानंद अनेकदा द कपिल शर्मा शोमध्ये दिसले आहेत. जानेवारी महिन्यात त्यांनी अभिषेक बच्चनसह एका चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं. तसंच फेब्रुवारी महिन्यात 'वागले की दुनिया' मालिकेच्या एक-दोन एपिसोडमधये काम केलं होतं. पण मार्च महिन्यापासून त्यांच्या हातात कोणतंही काम नाही. यादरम्यान, त्यांचं दारु पिण्याचं प्रमाणही वाढलं आहे. 


याआधीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न, शेजाऱ्यांनी वाचवला होता जीव


दोन वर्षांपूर्वी 27 डिसेंबर 2021 मध्येही तीर्थानंद यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात दाखल करत त्यांचा जीव वाचवला होता. त्यावेळी करोनामुळे काम मिळणं बंद झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं होतं.