बॉलिवूडमध्ये यशस्वी होणं फार सोपी गोष्ट नाही. अभिनेते असोत किंवा गायक, दिग्दर्शक सर्वांनाच चढ उतार पाहावा लागतो. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एखाद्याने आपल्या यशस्वी कारकिर्दीत सुसंगतता ठेवली तर ते आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. याचं कारण अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यापासून यश चोप्रा, राज कपूर यांनाही आयुष्यात कधी ना कधी फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला आहे. सध्या 'गदर 2' चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर असणाऱ्या सनी देओललाही मागील 20 ते 23 वर्षात एकही चित्रपट सुपरहिट करता आला नव्हता. पण बॉलिवूडच्या या झगमगाटात एक असा दिग्दर्शक आहे, जो मागील 25 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे, पण एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. या दिग्दर्शकाने केलेला प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. बरं नुसताच सुपरहिट नाही तर 100 कोटींच्या घरात पोहोचवले आहेत. या दिग्दर्शकाच्या नावावर एकही फ्लॉप चित्रपट नाही. 


प्रत्येक चित्रपटाची 100 कोटींची कमाई


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा दिग्दर्शक दुसरा तिसरा कोणी नसून करण जोहर आहे. करण जोहरने गेल्या 25 वर्षात जितक्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे, त्या सर्व चित्रपटांनी 100 कोटींची कमाई केली आहे. 


करण जोहरने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर 1998 मध्ये करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट होता कुछ कुछ होता है...त्यावर्षीचा हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 107 कोटींची कमाई केली होती.


यानंतर करण जोहरने 'कभी खुशी, कभी गम', 'कभी अलविदा ना केहना', 'माय नेम इज खान' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. कभी खुशी, कभी गम चित्रपटांनी 100 कोटींचा टप्पा गाठला होता. तर माय नेम इज खान चित्रपटाने 223 कोटींची कमाई केली होती. यानंतर करण जोहरने पुन्हा एकदा 'स्टुडंट ऑफ द ईयर' आणि 'ए दिल है मुश्किल' असे सुपरहिट चित्रपट दिले. 'स्टुडंट ऑफ द ईयर'ने 100 कोटींचा पल्ला गाठला होता. तर 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा गाठला होता. 


तसंच यावर्षी करण जोहरने दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हादेखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तब्बल सात वर्षांनी करण जोहरने या चित्रपटातून दिग्दर्शनात पुनरागमन केलं होतं. या चित्रपटाने जगभरात 350 कोटींची कमाई केली. करण जोहरच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 


सर्वाधिक चित्रपट 100 कोटींच्या यादीत असणारा दिग्दर्शक


करण जोहरने दिग्दर्शित केलेले सर्व 6 चित्रपट 100 कोटींच्या यादीत असताना, असा एकमेव दिग्दर्शक आहे ज्याने करण जोहरला याबाबतीत मागे टाकलं आहे. रोहित शेट्टीचे तब्बल 9 चित्रपट आहेत ज्यांनी जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. यामध्ये गोलमाल 3 पासून ते सूर्यवंशीपर्यंतच्या चित्रपटांचा समावेस आहे. यामध्ये त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसचा समावेश आहे, ज्याने 423 कोटी रुपये कमावले. 


दरम्यान रोहित शेट्टीचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉपही झाले आहेत. हे चित्रपट 100 कोटी कमवू शकले नाहीत. यामध्ये जमीन (18 कोटी), संडे (32 कोटी) आणि सर्कस (62 कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे.