राष्ट्रीय पुरस्कार विजेता `कस्तुरी` सिनेमाचं पोस्टर झालं रिलीज
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला कस्तुरी या हिंदी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर केलं.
मुंबई : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला कस्तुरी या हिंदी चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर शेअर केलं.
इनसाइड फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप हे प्रस्तुत करत आहेत. विनोद कांबळे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एक उल्लेखनीय बाब अशी की चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक,मुख्य कलाकार यांचा हा पहिला चित्रपट असूनही थेट राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत बाजी मारली.
या सोबतच हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये निवडला गेला होता. तिथेही कस्तुरी या चित्रपटाचे खूप कौतुक करण्यात आले तसेच चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले.कस्तुरी हा सिनेमा सनी चव्हाण नावाच्या एका पोस्टमार्टम करणाऱ्या मुलाच्या सत्य घटनेवर आधारित असून बार्शी मधील कथा आहे. आपल्या अंगाचा वास येऊ नये म्हणून कस्तुरीच्या अत्तराचा शोध घेणाऱ्या दोन मित्रांची धडपड या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
खरं पाहायला गेलं तर समाजातील एक पारंपारिक काम करणाऱ्या मुलाला पारंपारिक काम करण्यासाठी शिक्षण सोडून द्यावे लागते. कोवळ्या स्वप्नांना नवीन पालवी फुटत असताना ही मुलं आर्थिक व सामाजिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. आपली ओळख आपल्या कामावर ठरत नाही ती आपण काय काम करतो आणि कशाप्रकारे काम करतो यावर ठरते. शिक्षण हे असे माध्यम आहे की ज्यातून माणसात सकारात्मक परिवर्तन घडून येते. पारंपारिक कामामुळे शिक्षणापासून दूर ढकलले गेलेल्या परंतु शिक्षणाची ओढ असणाऱ्या पोस्टमार्टम करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित अशा एका मुलाची गोष्ट आहे.
एकूण आठ महिलांनी एकत्र येऊन सिनेमाची निर्मिती केली असून चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित होत आहे .तसेच समाज माध्यमांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे.या चित्रपटामध्ये समर्थ सोनवणे मुख्य भूमिकेत असून श्रवण उपलकर सह अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. अभय चव्हाण यांनी निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहिले असून चित्रपटाचे सहलेखन व वेशभूषा शिवाजी करडे यांनी केलं आहे.
छायाचित्रण मनोज काकडे यांनी केलं असून संकलन श्रीकांत चौधरी यांनी केलं आहे. कला दिग्दर्शन अतुल लोखंडे केलं आहे आणि रंगभूषा व वेशभूषा सुरेश कुंभार केलं आहे. तसेच पार्श्व संगीत विजय शिंदे यांनी केले आहे. निर्मिती सहाय्यक म्हणून महेश शिरसागर यांनी काम पाहिलं. तसेच लाईन प्रोडूसर म्हणून विजय शिखरे यांनी काम पाहिलं.